Satyajeet Tambe: निलंबन कारवाईवर सत्यजित तांबेंची पहिली सूचक प्रतिक्रिया; म्हणाले, “२२ वर्ष एकनिष्ठतेने...”
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2023 02:26 PM2023-01-20T14:26:08+5:302023-01-20T14:26:59+5:30
Satyajeet Tambe: सगळे राजकारण होऊ द्या, मग त्यावर बोलेन. योग्य वेळी निर्णय घेईन, असे सत्यजित तांबे यांनी स्पष्टपणे सांगितले.
Satyajeet Tambe: विधानपरिषद पदवीधर निवडणुकीत पक्षादेश झुगारून मुलासाठी उमेदवारीतून माघार घेतल्यामुळे सुरुवातीला डॉ. सुधीर तांबे आणि यानंतर आता डॉ. सत्यजित तांबे यांच्यावर काँग्रेसने कारवाई केली. सत्यजित तांबे यांना ६ वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. या निवडणुकीकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे. तांबे पिता-पुत्रांनी बंडखोरी केल्यानंतर काँग्रेससह महाविकास आघाडीने शुभांगी पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. यातच सत्यजित तांबे यांनी काँग्रेसने केलेल्या निलंबनाच्या कारवाईनंतर यावर भाष्य करत सूचक प्रतिक्रिया दिली आहे.
काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा कधीच विचार केला नाही. २२ वर्षं काँग्रेसमध्ये काम केले आहे. जन्मल्यापासून फक्त काँग्रेसच माहिती आहे. माझ्या रक्तात काँग्रेस आहे. माझ्या श्वासात काँग्रेस आहे. आम्ही काँग्रेस सोडून कधी दुसरा विचार केला नाही. अनेक लोक अनेक पक्षांमध्ये गेले, आले. मोठे झाले. पण आम्ही कधी तशी भावना ठेवली नाही. आम्ही एकनिष्ठतेने आम्ही पक्षाबरोबर राहण्याचे काम केले आहे, असे सत्यजित तांबे यांनी स्पष्ट केले आहे.
निलंबित केल्याचे दु:ख आहेच, योग्य वेळी उत्तर देईन
निलंबित केल्याचं दु:ख आहेच. योग्य वेळी मी त्याला उत्तर देईन.अनेक शिक्षक संघटना, शिक्षकेतर कर्मचारी संघटना, बँकिंग कर्मचारी संघटना, अनेक लोक, पदाधिकारी मला पाठिंबा देण्याससाठी इच्छुक आहेत. योग्य वेळी त्यावर मी निर्णय घेईन. राजकारण चाललेले आहे. सगळे राजकारण होऊ द्या, मग मी त्यावर बोलेन, असे सत्यजित तांबे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, २०३० साली माझ्या परिवाराला काँग्रेसमध्ये १०० वर्ष पूर्ण होणार आहेत. माझ्या पणजोबा-आजोबांपासून आम्ही सतत चार चार पिढ्या काँग्रेसमध्ये काम करत आहोत. सत्ता येतात, जातात. सत्तेची पदे आमच्यासाठी फार महत्त्वाची नाहीत. सत्ता आम्ही जन्मल्यापासून पाहातो आहोत. १९८५ साली थोरात साहेब आमदार झाले. त्याआधी माझे आजोबा भाऊसाहेब थोरात हेही आमदार होते. त्यामुळे सत्ता हा आमच्यासाठी फार महत्त्वाचा मुद्दा नाही. राजकारणात आपण काय काम करण्यासाठी आलो आहोत, ते माझ्यासाठी फार महत्त्वाचे आहे, असे सत्यजित तांबे म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"