Satyajeet Tambe : 'उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी...', सत्यजित तांबे यांचे ट्विट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2023 04:46 PM2023-02-14T16:46:16+5:302023-02-14T16:50:20+5:30
'मी असतो तर सत्यजीत तांबेबाबत टेक्निकल चूक होऊ दिलीच नसती.'-बाळासाहेब थोरात
Satyajeet Tambe News: काही दिवसांपूर्वी विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत सर्वांचे लक्ष नाशिकच्या निवडणुकीवर होते. या जागेवरुन काँग्रेसचे बंडखोर नेते सत्यजित तांबे यांचा विजय झाला. या विजयानंतर सत्यजित तांबेकाँग्रेसमध्ये परतणार की, नवीन पक्षात प्रवेश करणार, ही चर्चा सुरू आहे. यातच तांबेंनी आज केलेल्या एका ट्विटमध्ये नवीन चर्चा सुरू झाली आहे.
उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी…
— Satyajeet Tambe (@satyajeettambe) February 14, 2023
नजरेत सदा नवी दिशा असावी ।
घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही…
क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी ।
सत्यजित तांबे प्रकरणावरुन काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. एक गट नाना पटोले यांचा तर दुसरा गट बाळासाहेब थोरात यांचा. यातच, बाळासाहेब थोरातांनी सत्यजित तांबे यांच्या निलंबनावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यानंतर तांबे यांनी ट्विट केले की, "उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी…नजरेत सदा नवी दिशा असावी। घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही…क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी।" असे सूचक ट्विट तांबे यांनी केले आहे.
सत्यजित तांबे यांच्या ट्वीटमुळे राजकीय वर्तुळात नवीन चर्चांना उधाण आले आहे. कारण, तांबेंनी बंडखोरी केल्यापासून ते भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे तांबे यांच्या ट्विटचे अनेक अर्थ लावले जात आहेत. दरम्यान, विधान परिषदेच्या निवडणुकीपासून काँग्रेसमध्ये गोंधळ सुरू झाला. याबाबत बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, 'मी मध्ये काँग्रेस श्रेष्ठींना एक पत्र लिहिले त्यात मी निवडणुकी काळात जे घडल त्यात मी सर्व सांगितले. विधान परिषद निवडणुकीत मी आजारी असल्यामुळे सक्रीय नव्हतो. मी असतो तर सत्यजीत तांबेबाबत जी टेक्निकल चूक झाली ती चूक मी होऊ दिलीच नसती. या संदर्भात काँग्रेसच्या हायकमांडने दखल घेतली.'