Maharashtra Politics: गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात अनेकविध विषयांवर चर्चा रंगताना दिसत आहेत. विधान परिषद निवडणुकीवरून सत्यजित तांबे यांच्यावर काँग्रेस पक्षाने निलंबनाची कारवाई केली होती. यावरून पुन्हा एकदा सत्यजित तांबे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस निलंबनाची कारवाई केल्याने अद्यापही नाराज आहात का? असा प्रश्न सत्यजित तांबे यांना विचारण्यात आला होता.
सत्यजीत तांबे यांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाला भेट देत अभिवादन केले. तेव्हा त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत निवडणुकीवेळी झालेली कारवाई आणि भविष्यातील वाटचालीबद्दल भाष्य केले. सत्यजित तांबे म्हणाले की, माझे काँग्रेसच्या वरिष्ठांशी मतभेद झाले नाहीत. तसेच, कोणाशी मतभेद असण्याचे कारणही नाही. निवडणुकीच्या काळात घडलेल्या घटनांबद्दल अनेक माध्यमातून स्पष्टीकरण दिले आहे, असे त्यांनी सांगितले.
काही ठराविक लोकांनी गैरसमज निर्माण केला
काही ठराविक लोकांनी गैरसमज निर्माण केला. त्यातून पक्षाने माझ्यावर कारवाई केली. पिढ्यांपिढ्या आम्ही काँग्रेसमध्ये काम करणारी लोक आहोत. आमच्या कुटुंबाला काँग्रेसमध्ये १०० वर्षे होत आहेत. मीदेखील २२ वर्ष काँग्रेसच्या विद्यार्थी आणि युवक चळवळीत काम केले आहे. त्यामुळे आम्हाला ढकलून देण्याचा प्रयत्न काही लोकांकडून झाला. त्याविरोधात आमची लढाई होती आणि ती अजूनही चालूच आहे. मला चर्चेला बोलावले तर पक्षावरची नाराजी दूर होईल. पण, अद्यापही कोणीही चर्चेसाठी बोलावले नाही, असे सत्यजित तांबे यांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"