काँग्रेसची उमेदवारी वडिलांना, पण अर्ज भरला मुलानं! सत्यजित तांबेंच्या उमेदवारीवरुन गोंधळ, आता...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 03:58 PM2023-01-12T15:58:17+5:302023-01-12T16:00:26+5:30

विधान परिषद पदवीधर नाशिक मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवारीवरुन मोठा ट्विट पाहायला मिळत आहे.

satyajeet tambe submits two forms congress and independent nashik graduate constituency for maharashtra legislative council | काँग्रेसची उमेदवारी वडिलांना, पण अर्ज भरला मुलानं! सत्यजित तांबेंच्या उमेदवारीवरुन गोंधळ, आता...

काँग्रेसची उमेदवारी वडिलांना, पण अर्ज भरला मुलानं! सत्यजित तांबेंच्या उमेदवारीवरुन गोंधळ, आता...

googlenewsNext

नाशिक-

विधान परिषद पदवीधर नाशिक मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवारीवरुन मोठा ट्विट पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीमध्ये झालेल्या चर्चेनुसार नाशिक पदवीधर विधान परिषदेची जागा ही काँग्रेसला देण्यात आली होती. काँग्रेसने या निवडणुकीत पुन्हा एकदा डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर केली. पक्षाकडून सुधीर तांबे यांच्यासाठीचा एबी फॉर्म देखील जारी करण्यात आला. पण आज उमेदवारी अर्ज दाखल करताना सुधीर तांबे यांचे चिरंजीव सत्यजित तांबे यांनी काँग्रेसकडून अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करुन आल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना डॉ. सुधीर तांबे यांनी आपण निवडणुकीतून माघार घेत असल्याचं जाहीर केलं. 

दरम्यान, पक्षाकडून एबी फॉर्मवर डॉ. सुधीर तांबे यांनाच जारी करण्यात आल्यानं सत्यजित तांबे यांचा उमेदवारी अर्ज बाद होऊ शकतो. त्यामुळे खबरदारी म्हणून सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवार म्हणूनही आणखी एक अर्ज दाखल केला आहे. "सत्यजित तांबे युवा उमेदवार असून त्यांना उमेदवारी मिळायला हवी अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये होती. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनाही याबाबतची कल्पना आहे. सत्यजित तांबे यांनाच उमेदवारी देण्याबाबत काँग्रेस नेत्यांचंही म्हणणं होतं पण काही तांत्रिक चुकीमुळे आणि संवादातील त्रुटीमुळे एबी फॉर्म वेळात पोहोचू शकलेला नाही", असं कारण डॉ. सुधीर तांबे यांनी यावेळी दिलं आहे. 

पाठिंब्यासाठी सर्वपक्षीयांना विनंती करणार- सत्यजित तांबे
आपणच काँग्रेसचे उमेदवार असल्याचा दावा सत्यजित तांबे यांनी केला आहे. तसंच या निवडणुकीसाठी सर्वपक्षीयांना पाठिंब्यासाठी विनंती करणार असल्याचंही ते म्हणाले. "काँग्रेस पक्षातील पक्ष श्रेष्ठींचीही मला उमेदवारी देण्याची इच्छा होती. पक्षानं मात्र निर्णय घेताना डॉ. सुधीर तांबे यांच्या नावाची घोषणा केली. तांत्रिक काही अडचणीमुळे शेवटच्या क्षणाला मला एबी फॉर्म मिळू शकलेला नाही. त्यामुळे मी दोन फॉर्म भरले आहेत. एक काँग्रेस पक्षाचा आणि एक अपक्ष उमेदवार म्हणून भरला आहे. माझ्या नावाचा एबी फॉर्म वेळेवर येऊ न शकल्यानं मला अपक्ष उमेदवार म्हणूनच निवडणूक लढवावी लागेल. परंतु मी उमेदवार काँग्रेस पक्षाचाच आहे. असं असलं तरी मी सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांना भेटून पाठिंब्याची विनंती करणार आहे. राजकीय पक्षाच्या सीमेच्या पलिकडे जाऊन माझ्या पाठिशी उभं राहावं अशी माझी अपेक्षा आहे. मला सर्वांचा पाठिंबा मिळावा असा प्रयत्न करणार आहे", असं सत्यजित तांबे म्हणाले. 

भाजपकडून उमेदवारीचीही सुरू होती चर्चा
युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष सत्यजीत तांबे यांना भाजपकडून उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यामुळे भाजप कोणाला उमेदवारी जाहीर करणार, याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. पण सत्यजित तांबे यांनी या सर्व चर्चांमध्ये काहीच तथ्य नसल्याचं सांगत पूर्णविराम दिला आणि काँग्रेस पक्षाचाच उमेदवार म्हणून फॉर्म भरल्याचं स्पष्ट केलं आहे. फक्त तांत्रिक कारणामुळे वेळेत पक्षाचा एबी फॉर्म न मिळाल्यानं अपक्ष उमेदवार म्हणूनही एक फॉर्म भरावा लागला असल्याचं ते म्हणाले. 

Web Title: satyajeet tambe submits two forms congress and independent nashik graduate constituency for maharashtra legislative council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.