नाशिकमध्ये सत्यजित तांबे विजयी होतील, त्यानंतर...; अजित पवारांनी स्पष्टच सांगितले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2023 06:46 PM2023-02-02T18:46:52+5:302023-02-02T18:48:11+5:30
काँग्रेस हायकमांडनं पक्षशिस्त भंग केल्याप्रकरणी तांबे पिता-पुत्रांवर निलंबनाची कारवाई केली. या निवडणुकीत भाजपाची भूमिका निर्णायक ठरली.
मुंबई - विधान परिषदेच्या ५ जागांसाठी ३० जानेवारीला मतदान घेण्यात आले. या निवडणुकीत भाजपा-शिंदे गटविरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगला. या निवडणुकीत नागपूरची जागा विजयी करण्यात काँग्रेसला यश आले. तर कोकण शिक्षक मतदारसंघातून भाजपाचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी झाले. अमरावती-औरंगाबाद इथं अटीतटीची लढत सुरू आहे. त्यात नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजित तांबे विजयी होतील असा विश्वास विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केला.
अजित पवार यांनी सांगितले की, माझ्यासारख्यांनी काँग्रेसबद्दल बोलणं उचित नाही. एकेकाळी सत्यजित तांबे राज्यातील काँग्रेस युवकचे अध्यक्ष म्हणून बरीच वर्ष काम करत होते. पक्षाचा जवळचा कार्यकर्ता किंवा पक्षाशी बांधिलकी असणारा नवा चेहरा म्हणून पक्षाने जर उमेदवारी दिली असती तर असे काही घडले नाही. त्यामुळे नाईलाजास्तव सत्यजित तांबेंना अपक्ष उभे राहावे असं त्यांनी म्हटलं.
त्याचसोबत निवडणुकीच्या काळात काही वेगळ्या प्रकारचा निर्णय त्याठिकाणी झाले. तांबे यांचे अख्खं घराणे, काँग्रेसच्या विचारधारेचे आहे. सुधीर तांबे हे आमदार होते. त्यामुळे सत्यजित तांबे सध्या आघाडीवर आहे. तेच निवडून येतील. त्यामुळे निवडून आल्यानंतर योग्य तो निर्णय घेतील असं सांगत अजित पवारांनी अप्रत्यक्षपणे सत्यजित तांबेंना सल्ला दिला आहे.
नाशिक पदवीधर मतदारसंघात रंगलं नाट्य
विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघात शेवटच्या क्षणापर्यंत नाट्य रंगलं होते. याठिकाणी काँग्रेसनं विद्यमान आमदार सुधीर तांबे यांना एबी फॉर्म देत त्यांची उमेदवारी घोषित केली. त्यानंतर सुधीर तांबे मुलासह विभागीय कार्यालयात पोहचले. त्याठिकाणी सुधीर तांबे यांनी अर्ज न भरता सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपत असताना या सर्व घडामोडी घडल्या त्यामुळे महाविकास आघाडीला धक्का बसला.
त्यानंतर काँग्रेस हायकमांडनं पक्षशिस्त भंग केल्याप्रकरणी तांबे पिता-पुत्रांवर निलंबनाची कारवाई केली. या निवडणुकीत भाजपाची भूमिका निर्णायक ठरली. भाजपाने निवडणुकीत कुणालाही उमेदवारी दिली नाही. मतदानाच्या दिवशीपर्यंत भाजपाने अधिकृत पाठिंबा जाहीर केला नाही. मात्र पडद्यामागून सत्यजित तांबे यांच्या विजयासाठी भाजपा प्रयत्नशील होती असं म्हटलं जाते. त्यात महाविकास आघाडीने याठिकाणी अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना समर्थन दिले होते. त्यामुळे सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील यांच्यात लढत होती. सध्या मतमोजणीत सत्यजित तांबे आघाडीवर आहेत. सत्यजित तांबेंचा विजय जवळपास निश्चित असल्याचं बोलले जात आहे.