नाशिक - विधान परिषदेच्या ५ जागांच्या निवडणुकीचे निकाल लागले असून या निवडणुकीत सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांचा विजय झाला आहे. सत्यजित तांबे यांना पाचव्या फेरी अखेर ६८ हजार ९९९ मते पडली. तर शुभांगी पाटील यांना ३९ हजार ५३४ मते पडली. त्यामुळे सत्यजित तांबे या निवडणुकीत तब्बल २९ हजार ४६५ मताधिक्यांनी निवडून आले आहेत.
नाशिक पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीने शुभांगी पाटील यांना समर्थन दिले होते. ऐन निवडणुकीत काँग्रेसनं एबी फॉर्म दिलेले सुधीर तांबे यांनी शेवटच्या क्षणी अर्ज भरलाच नाही. सुधीर तांबे यांनी मुलगा सत्यजित तांबे यांच्या अपक्ष उमेदवारीला पाठिंबा दिला. त्यामुळे निवडणुकीत काँग्रेसचा अधिकृत उमेदवार उभाच राहू शकला नाही. तर शुभांगी पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत उद्धव ठाकरेंकडे पाठिंबा मागण्यासाठी भेट घेतली. त्यानंतर महाविकास आघाडीने शुभांगी पाटील यांना त्यांचं समर्थन जाहीर केले. नाशिक पदवीधर निवडणुकीतील रंगतदार नाट्यामुळे राज्याचे लक्ष या निकालाकडे लागले होते. अखेर अपेक्षेप्रमाणे मतमोजणीवेळी पहिल्या फेरीपासून सत्यजित तांबे यांनी आघाडी घेतली होती. ती शेवटपर्यंत कायम ठेवली.
नाशिक पदवीधर मतदारसंघात रंगलं नाट्य विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघात शेवटच्या क्षणापर्यंत नाट्य रंगलं होते. याठिकाणी काँग्रेसनं विद्यमान आमदार सुधीर तांबे यांना एबी फॉर्म देत त्यांची उमेदवारी घोषित केली. त्यानंतर सुधीर तांबे मुलासह विभागीय कार्यालयात पोहचले. त्याठिकाणी सुधीर तांबे यांनी अर्ज न भरता सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपत असताना या सर्व घडामोडी घडल्या त्यामुळे महाविकास आघाडीला धक्का बसला.
त्यानंतर काँग्रेस हायकमांडनं पक्षशिस्त भंग केल्याप्रकरणी तांबे पिता-पुत्रांवर निलंबनाची कारवाई केली. या निवडणुकीत भाजपाची भूमिका निर्णायक ठरली. भाजपाने निवडणुकीत कुणालाही उमेदवारी दिली नाही. मतदानाच्या दिवशीपर्यंत भाजपाने अधिकृत पाठिंबा जाहीर केला नाही. मात्र पडद्यामागून सत्यजित तांबे यांच्या विजयासाठी भाजपा प्रयत्नशील होती असं म्हटलं जाते. त्यात महाविकास आघाडीने याठिकाणी अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना समर्थन दिले होते. त्यामुळे सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील यांच्यात लढत होती
विजयोत्सव नको;सत्यजित तांबेंचं आवाहनमाझा मित्र मानस पगार आज आपल्यातून गेलाय, त्यामुळे कोणताही आनंदोत्सव नाही. सर्व सहकाऱ्यांना विनंती आहे, कृपया संयम राखावा. मी ३ ते ७ फेब्रुवारीला संगमनेर येथे सर्वांना भेटणार आहे, त्यामुळे कोणतीही घाई करु नये असं आवाहन आमदार सत्यजित तांबे यांनी केले आहे.