संदीप प्रधान, वरिष्ठ सहायक संपादक -
केसापासून पायाच्या नखापर्यंत चिखलाने माखलेल्या राधाला (नर्गिस) पाहून वासनांध झालेल्या ‘मदर इंडिया’तील सुखीलालाचे (कन्हैयालाल) ते लोचट हास्य आपण विसरूच शकत नाही. सावकारी करणारा माणूस एखादे सुखी कुटुंब कसे उद्ध्वस्त करतो, याचे संतापजनक चित्रण त्या चित्रपटात आहे. अभिनेता कन्हैयालाल यांनी सुखीलाल अक्षरश: जिवंत केला. सावकारी आजही सुखनैव सुरू आहे. उल्हासनगरात मागच्याच आठवड्यात दोन घटना घडल्या. त्यांपैकी एका घटनेत गिरीश चुग या व्यक्तीने कामधंदा गमावल्याने घर चालवण्याकरिता घेतलेल्या कर्जाची परतफेड करता येत नसल्याने सावकारांच्या गुंडांचा त्रास असह्य झाल्याने व्हिडीओ काढून आपली कैफियत कथन केली व त्यानंतर रेल्वेखाली आत्महत्या केली. ही घटना घडल्याने समाजमन हादरले असतानाच रोहिणी अन्सारी या महिलेने फिनाइल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. चुग व अन्सारी यांनी मृत्यूला कवटाळण्यापूर्वी आपल्याला कोण सावकार त्रास देतात त्यांची नावे व्हिडीओत घेतली. मात्र उल्हासनगरातील पोलिसांनी कुणावरही कारवाई केलेली नाही.
‘लोकमत’ने या विषयाचा पाठपुरावा करीत सावकारीचा जाच सहन केलेल्या दोन व्यापाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांनी सोसलेल्या छळवादाची करुण कहाणी कथन केली. जीन्स कारखाने चालवण्यात तोटा सहन केल्यावर सावकाराकडून कर्ज काढण्याकरिता सावकारांचे दलाल त्यांना भेटले. कर्ज काढण्याकरिता त्या दलालांनी त्यांना भरीस घातले. कर्ज महिना २० टक्के व्याजाने दिले. वेळेवर हप्ता भरला नाही तर त्यावर दंड लागतो हे सांगितले नाही. मग पैशांकरिता छळ सुरू झाला. रस्त्यात पाठलाग करून मारहाण, घरात घुसून शिवीगाळ व मारहाण, घरातील महिलांना त्रास देणे वगैरे सर्व हातखंडे सावकारांचे गुंड अजमावतात. उल्हासनगरात सावकारी करणारे राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहेत.
राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपचे नेते रोज एकमेकांच्या उरावर बसलेले दिसतात. मात्र सावकारीच्या धंद्यात वसुली, मांडवली यांमध्ये एकमेकांना खुलेआम साथ देतात हे भीषण वास्तव ‘लोकमत’ने उघड केले. बँका व फायनान्शियल इन्स्टिट्यूट यांच्याकडून कर्ज मिळवायचे तर खूप कागदपत्रे लागतात. अर्थात कर्जचुकव्यांना धडा शिकवायला त्यांनीही संघटित टोळ्या पोसल्या आहेत, हा भाग अलाहिदा.
सावकारीचा कर्करोग सर्वदूर पसरलेला आहे. मुंबई महानगरातील महापालिकांच्या कर्मचाऱ्यांना चांगले वेतन मिळते. परंतु चतुर्थश्रेणी कर्मचारी हे अडीनडीकरिता सावकारांकडून कर्ज घेतात.
मुंबईत तर महापालिका कर्मचाऱ्यांचे पगार ज्या बँकेत होतात त्या बँकेचे एटीएम कार्ड सावकार आपल्याकडे ठेवतात. सफाई कामगार, शिपाई यांचे पगार खात्यात जमा झाल्यावर त्या कर्मचाऱ्यांसोबत एटीएमपाशी जातात व आपल्या कर्जाचा हप्ता पगारातून काढून घेतात व मग घरखर्चाचे पैसे काढायला कार्ड कर्मचाऱ्याला देतात. पुन्हा ते कार्ड काढून घेतात.
सावकारी कर्ज मरेपर्यंत संपत नाही. सहावा-सातवा वेतन आयोग लागू झाल्यावर सुबत्ता आल्याने सरकारी सेवेतील पती-पत्नी यांनीही गावागावांत सावकारी सुरू केल्याची काही उदाहरणे कानांवर येतात.