सावरकर मुद्द्यावरुन मुख्यमंत्र्याच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2019 05:49 AM2019-12-15T05:49:55+5:302019-12-15T05:50:19+5:30
आजच्या बैठकीत निर्णय होणार । रणजित सावरकरांनी देखील केली टीका
नागपूर : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंदर्भात कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर देशासह राज्यातील राजकारणदेखील तापले आहे. महाविकासआघाडीच्या सरकारमध्ये कॉंग्रेससह सहभागी असलेल्या शिवसेनेने या मुद्द्यावर मवाळ भूमिका घेतल्याने भाजपमधील नाराजी आणखी वाढली आहे. याचे पडसाद सोमवारपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात उमटणार असून पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांतर्फे आयोजित चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली आहे. यासंदर्भात रविवारी सकाळी ११ वाजता नागपुरात होणाºया बैठकीत अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
परंपरेनुसार मुख्यमंत्री अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी व विरोधकांना चहापानासाठी आमंत्रित करतात. साधारणत: विरोधकांकडून सरकार समस्यांप्रति गंभीर नसल्याचा आरोप करत यावर बहिष्कार टाकण्यात येतो. यंदा उद्धव ठाकरे यांचे हे मुख्यमंत्री म्हणून पहिलेच अधिवेशन राहणार आहे. त्यांनी रविवारी सायंकाळी ५ वाजता ‘रामगिरी’ येथे विरोधकांना चहापानासाठी निमंत्रित केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कॉंग्रेसकडून सावरकर यांच्यासंदर्भात आलेले वक्तव्य व शिवसेनेने घेतलेली अतिशय मवाळ भूमिका यामुळे बहुतांश भाजप आमदार हे नाराज आहे.
अगोदरच शिवसेनेने सत्तास्थापनेच्या वेळी तोडलेली युती व त्यात आता सावरकरांबाबतच्या वादामुळे चहापानाला जाऊ नये असे त्यांचे मत आहे.
राहुल गांधींचे आडनाव सावरकर नाही हे चांगले; अन्यथा तोंड काळे करावे लागेल - रणजित सावरकर
मुंबई : काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांचे नाव राहुल सावरकर नाही हे चांगले आहे, अन्यथा आम्हाला तोंड काळे करावे लागले असते, अशी टीका सावरकरांचे नातू व सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी केली आहे. राहुल गांधी यांनी त्यांच्या आजी इंदिरा गांधी यांचे त्यांच्या नावातून नेहरू काढल्याबद्दल आभार मानले पाहिजेत.
कारण त्यांचे आधीचे नाव इंदिरा गांधी-नेहरू होते. देश स्वतंत्र होण्याच्या एक वर्ष आधीच सत्तेच्या मोहाने नेहरूंनी व्हॉइसराय मंडळाचे सदस्य बनण्यासाठी भारताचे सम्राट किंग जॉर्ज (सहावे) आणि त्यांचे उत्तराधिकारी व वंशज यांच्याशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतली होती, असा आरोप त्यांनी केला.
सावरकरांनी असे घृणास्पद कृत्य करण्याचा स्वप्नातदेखील विचार केला नसता. ही गुलामीची शपथ नेहरूंनी निष्ठेने निभावली होती, १५ आॅगस्ट, १९४७ला भारत स्वतंत्र झाल्यावरही ते १९५० पर्यंत किंग जॉर्जलाच भारताचा सम्राट मानत होते आणि सर्व महत्त्वपूर्ण निर्णय घेताना त्यांची अनुमती घेत होते, असा आरोप त्यांनी केला.
अद्याप अंतिम निर्णय नाही : फडणवीस
यासंदर्भात विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना संपर्क केला असता अद्यापपर्यंत चहापानाबाबत अंतिम निर्णय झाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रविवारच्या बैठकीत आमदारांचे मत लक्षात घेऊन याबाबत आम्ही भूमिका ठरवू, असे त्यांनी सांगितले.