ठाणे : ज्ञात-अज्ञात सावरकर, सावरकर एक झंझावात, कवी सावरकर, पत्रकार सावरकर, शब्दप्रभू सावरकर या विविध विषयांवरील व्याख्याने, परिसंवाद, याबरोबरच सावरकरांची गीते, नाट्यप्रवेश अशा विविध कार्यक्रमांनी चौथे स्वातंत्र्यवीर सावरकर विश्व साहित्य संमेलन सिडनी (आॅस्ट्रेलिया) येथे रंगणार आहे. स्वा. सावरकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त जागतिक सांस्कृतिक आणि सामाजिक मंच व महाराष्ट्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने २८ मे २०१७ रोजी हे संमेलन होणार असून, त्याची तयारी अंतिम टप्प्यात आल्याची माहिती रविवारी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. या परिषदेला ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत डॉ. सच्चिदानंद शेवडे, अभिनेते शरद पोंक्षे, दीपक दळवी आणि दिलीप ठाणेकर उपस्थित होते.संमेलनास मराठी असोसिएशन सिडनी इनकॉर्पोरेटेड या संस्थेने निमंत्रण दिले असून, या संस्थेचे अध्यक्ष नितीन चौधरी, सचिव भूषण महाजन, गणेश देऊळकर आदी मंडळी सिडनीमधील तयारी करीत आहेत. त्यांच्या मदतीला मेलबॉर्न व पर्थ येथील महाराष्ट्र मंडळेदेखील आहेत. संमेलन सिडनीमधील लेन्को शहरात होणार आहे. या संमेलनास महाराष्ट्रातून शेवडे व पोंक्षे यांच्यासह विचारवंत देवेंद्र भुजबळ, इतिहास अभ्यासक श्रीपाद चितळे, कवयित्री स्वाती सुरंगळीकर आदी मान्यवरांसह जवळपास १०० सावरकरप्रेमी मंडळी उपस्थित राहाणार आहेत. या वेळी ‘प्रभो शिवाजी राजा’ हा विशेष कार्यक्रमदेखील होणार आहे. (प्रतिनिधी)>सावरकर राहात असलेले ब्रिटनमधील ओल्ड इंडिया हाउस सरकारने ताब्यात घ्यावे, यासाठी गेली तीन-चार वर्षे मी सरकारकडे मागणी करीत आहे. महाराष्ट्र सरकारने अजूनही बाब मनावर घेतलेली नाही. ही जागा ताब्यात घेतल्यास, त्या ठिकाणी सावरकरांचे स्मारक होऊ शकते.’-डॉ. सच्चिदानंद शेवडे
सिडनीत सावरकर साहित्य संमेलन
By admin | Published: April 03, 2017 2:55 AM