मुंबई : काश्मीरमध्ये भारतीय जवानांची हत्या आणि वाढते दहशतवादी हल्ल्यांवरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. सरकारने गायी वाचवण्यापेक्षा देश वाचवावा, असे सांगत केवळ एका सर्जिकल स्ट्राईकने पाकिस्तान वठणीवर येणार नाही. त्यासाठी पाकमध्ये घुसून हल्ला चढवला पाहिजे, असेही उद्धव म्हणाले.येथील रंगशारदा सभागृहात आयोजित शिवसेना कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षण मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवरून भाजपावर चौफेर टोलेबाजी केली.देशातील गायींना वाचवले पाहिजे. मात्र, अगोदर देश वाचवण्याची गरज आहे. पाककडून होणाऱ्या हल्ल्यांनंतर शहिदांच्या कुटुंबीयांकडून नृशंस कृत्यांचा बदला घेण्याची मागणी होत आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये घुसा आणि पाकिस्तानचे तुकडे पाडा. शिवसेना तुमच्या पाठीशी आहे. पक्ष मजबूत करण्याचे स्वप्न बघताय, देश मजबूत करण्याचे स्वप्न कधी बघणार, असा सवालही उद्धव यांनी केला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरुनही त्यांनी भाजपाला सुनावले. शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे. त्यांच्या बाजूने आम्ही बोललो तर आम्ही विरोधात बोलतो, असे त्यांना वाटते. शेतकरी जेव्हा आपले कौतुक करतो तेच आपले यश, असेही ठाकरे म्हणाले. उद्धव यांनी निवडणुकांमध्ये भाजपाकडून होणारा पैशांचा वापर व ‘ईव्हीएम’विषयीही सवाल केले. ईव्हीएमला दोष देत नाही. मात्र, या मशीनबद्दल माझा एक आक्षेप आहे, माझे मत कुणाला गेले, हे मला कळू शकत नाही. लोकशाहीतील हा अधिकार ईव्हीएममुळे हिसकावून घेतला जात आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. उतरप्रदेशाच्या यशाबद्दल मी पंतप्रधानांचे अभिनंदन केले होते. मात्र गोव्याच्या निकालाकडे दुर्लक्ष करत येणार नाही. गोव्यात काँग्रेसने कोणताही चेहरा दिला नव्हता तरीही भाजपापेक्षा काँग्रेसला चार जागा जास्त मिळाल्या, असे सांगतानाच मध्यावधी निवडणुकांच्या चर्चांवरही ठाकरे यांनी भाष्य केले. मध्यावधी निवडणुका उद्या कशाला, आजच घ्या असे आव्हानही त्यांनी भाजपाला दिले. (प्रतिनिधी)यूपीत योगी, महाराष्ट्रात निरुपयोगीमला कोणीतरी म्हटले की उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकार आहे, तर महाराष्ट्रामध्ये निरुपयोगी सरकार आहे. आज राज्यात भाजपाची अशी प्रतिमा तयार झाली आहे, असा चिमटाही उद्धव यांनी काढला. दरम्यान, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी आज वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दगडखाणी बंदीमुळे रस्ते काम रखडल्याचे सांगितले. मुख्यमंत्र्यांनी खाणींबाबत कायदेशीर मार्ग काढण्याबाबत विभागीय आयुक्तांना सूचना दिल्याची माहिती आदित्य यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
गाय वाचवण्यापेक्षा देश वाचवा - उद्धव ठाकरे
By admin | Published: May 04, 2017 5:05 AM