मुंबई : राज्यातील भाजपा-शिवसेना या दोन सत्ताधारी पक्षांतील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला असून एकमेकांना पाण्यात पाहण्याची एकही संधी सोडली जात नाही. मात्र, युतीतील या तणावाचा फटका मुंबई महापालिकेने तयार केलेल्या ‘जान बचाओ’ या लघुपटास बसला आहे. विशेष म्हणजे, हा लघुपट उच्च रक्तदाब आणि तणावपूर्ण जीवनशैलीवर प्रबोधन करणारा आहे!स्वतंत्र विदर्भाची मागणी आणि नाशिकमध्ये भाजपाच्या महिला अध्यक्षांचा उधळलेला कार्यक्रम, यावरून युतीच्या नेतृत्वात बेबनाव धुमसत आहे. त्यात देवनार डम्पिंग ग्राउंडला लागलेल्या आगीने भडका उडाला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर शेलक्या शब्दांत केलेल्या टीकेमुळे सत्ताधारी युतीतील तणाव अधिकाधिक ठळक होत आहे. मुंबईतील नागरिकांमध्ये वाढत चाललेले रक्तदाबाचे प्रमाण आणि तणावपूर्ण जीवनशैलीवर प्रबोधन करण्यासाठी पालिकेनेच तयार केलेल्या लघुपटास पडद्यावर येण्यासाठी युतीतील बेदिलीमुळे उशीर होत आहे. जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने ‘जान बचाओ’ ही विशेष मोहीम मुंबई महापालिकेतर्फे हाती घेण्यात आली आहे. रक्तदाबाच्या वाढत्या प्रमाणामुळे चिंतित होऊन पालिकेने त्यावर चार मिनिटांची फिल्म बनविण्याचा निर्णय घेतला. सामाजिक कार्य म्हणून दिग्दर्शक राजकुमार हिराणी आणि अभिनेता अक्षय कुमार यांनी त्यासाठी विनामोबदला योगदानही दिले. ही फिल्म ४ एप्रिल रोजी ताज लँड्स एन्ड हॉटेलमध्ये पडद्यावरही येणार होती; मात्र अचानक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वेळ नसल्याने या लघुपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. आता मे महिन्यामध्ये ही फिल्म प्रसारित होणार आहे. लघुपटाच्या प्रदर्शनासाठी मुख्यमंत्री फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुखांना वेळ नसल्याचे कारण पुढे केले असले, तरी दोन्ही नेते हेतूपुरस्सर एकाच व्यासपीठावर येण्याचे टाळत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
युतीच्या तणावात ‘जान बचाओ’ !
By admin | Published: April 07, 2016 2:57 AM