“पैसे नसल्यानं लोकांचे जीव जातायेत; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या माजीप्रमुखांना अश्रू अनावर
By प्रविण मरगळे | Published: September 21, 2020 12:50 PM2020-09-21T12:50:04+5:302020-09-21T13:49:32+5:30
या कक्षाबाबतचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे, त्याचा कसा वापर करावा हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाच ठरवायचा आहे. पण सध्या लोकांची अवस्था अत्यंत बिकट आहे असं ओमप्रकाश शेटे यांनी सांगितले.
औरंगाबाद – राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रविवारी दिवसभरात राज्यात २० हजाराहून जास्त कोरोना रुग्ण आढळले तर आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या १२ लाखांच्या वर पोहचली आहे. तर कोरोनामुळे मृत झालेल्यांची संख्या ३२ हजारापर्यंत गेली आहे. राज्यात लोकांकडे पैसे नसल्याने उपचाराअभावी त्यांचे जीव जात आहेत असा आरोप मुख्यमंत्रीवैद्यकीय कक्षाचे माजी प्रमुख ओमप्रकाश शेटे यांनी केला आहे.
याबद्दल एका पत्रकार परिषदेत ओमप्रकाश शेटे यांना अश्रू अनावर झाले. आपल्याकडे रोज सामान्य माणसाचे मेसेज येतात परंतु त्यांना काहीच मदत करता येत नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. याबाबत ते म्हणाले की, मी मुख्यमंत्रीवैद्यकीय सहायता निधीचा प्रमुख राहिलो आहे. ज्या ताटात जेवलो तिथे छिद्र करणार नाही, खूप वाईट वाटतं, कधी कधी झोप येत नाही, आम्ही ज्या ठिकाणी मंदिर उभं केले, त्या मंदिराचा ढाचा पाडण्यात आला. सामान्य माणूस वाचत नाही, या कक्षाबाबतचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे, त्याचा कसा वापर करावा हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाच ठरवायचा आहे. पण सध्या लोकांची अवस्था अत्यंत बिकट आहे असं त्यांनी सांगितले. नुकताच त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
तसेच १७ लाख लोकांची आम्ही सेवा केली होती. दिवसाला ६०० जणांचे मेसेज येतात, लोकांना रिप्लाय देऊन थकलो आहे, सामान्य माणसाचे जीव जातायेत, कोणाकडून अपेक्षा नसल्याने आता कोर्टात गेलो आहे. पैसे नसल्यामुळे अनेकांचे जीव गेले आहेत. जर सामान्य माणूस वाचू शकत नाही नसेल तर त्याचं दु:खं आहे. हे मी मनापासून सांगतोय, अनेक लोकांकडे पैसे नाहीत म्हणून ते मरत आहेत. या सगळ्या लोकांना आता न्यायालयानेच वाचवावे, यातील तांत्रिक अडचणी दूर कराव्यात असं सांगताना ओमप्रकाश शेटे यांना अश्रू अनावर झाले.
उपचाराअभावी लोकांचे जीव जात आहेत, सामान्य माणसाला कोणीच वाली नाही, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे माजीप्रमुख ओमप्रकाश शेटे पत्रकार परिषदेत रडले @CMOMaharashtra@OmprakashShete#Maharashtrapic.twitter.com/7FhwvNA3pW
— Lokmat (@MiLOKMAT) September 21, 2020
राज्य शासनाच्या आरोग्यविषयक धोरणाविरुद्ध औरंगाबाद खंडपीठात दाखल जनहित याचिकेच्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला यांनी राज्य शासनासह इतर प्रतिवाद्यांना नोटीस बजावण्याचा आदेश बुधवारी दिला. याचिकेच्या अनुषंगाने प्रतिवादींना १५ दिवसांत उत्तर दाखल करावयाचे आहे. राज्य शासन व इतर शासकीय प्रतिवादी यांच्या वतीने मुख्य सरकारी वकील डी. आर. काळे यांनी नोटीस स्वीकारली, अशी माहिती याचिकाकर्ते ओमप्रकाश शेटे यांनी दिली आहे. ओमप्रकाश शेटे हे सध्या सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम करत आहेत. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात त्यांच्याकडे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या प्रमुखपदाची जबाबदारी होती.
मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्षाचे माजी प्रमुख ओमप्रकाश शेटे यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. आरोग्य प्रशासनाचे चुकीचे प्रशासकीय निर्णय आणि संकुचित हेतूमुळे सामान्य लोकांच्या उपचारासाठी खासगी दवाखान्याचे दरवाजे तूर्तास बंद झाले आहेत. यासंबंधी सुधारणा केली नाही, तर सामान्य माणसे केवळ उपचाराअभावी मृत्युमुखी पडतील, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या ११ लाखांच्या आसपास असतानासुद्धा राज्य शासनाकडून योग्य पावले उचलली जात नाहीत. देशात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंमध्ये ४० टक्के फक्त महाराष्ट्रातील आहेत. आरोग्य प्रशासनाचे चुकीच्या निर्णयामुळे सामान्य रुग्णांकरिता खासगी रुग्णालयाचे दरवाजे बंद झाले आहेत असा आरोप शेटे यांनी केला.