रेवणसिद्ध जवळेकर सोलापूरअपरात्री अचानक घरात शिरलेल्या कुऱ्हाड आणि करवतधारी दरोडेखोरांशी हिमतीने दोनहात करीत १५ आणि १३ वर्षांच्या भावांनी त्यांना पिटाळून लावले. बहिणीला वाचवण्यासाठी त्यांनी थेट हातावर कुऱ्हाडीचे वार झेलले, पण हिंमत हारली नाही. ही थरारक व स्फूर्तिदायक घटना रविवारी रात्री शहरात घडली. दुर्दैवाने या घटनेनंतर पोलिसांनी या चिमुकल्यांचे नुसते म्हणणेच ऐकून घेतले. कल्याणनगर भाग १च्या रुळाशेजारी असलेल्या निशिकांत ऊर्फ जॉय पॉल यांच्या घरात हा दरोडा पडला. दरोडेखोरांनी घरातील पाचही जणांना डांबून ठेवल्यावर ही दोन भावंडे आणि त्यांच्या बहिणीचा त्यांच्याशी तासभर संघर्ष सुरू होता. जीव धोक्यात घालून एका भावाने करवत हातावर झेलला, तर दुसऱ्याने कुऱ्हाड रोखताच दरोडेखोरांनी पळ काढला.रविवारी रात्री निशिकांत उर्फ जॉय पॉल, त्यांची आई शकुंतला, मुलगी ख्रिस्टिना (वय-१७), मुले मेशक (१५) आणि यश (१३) हे सर्व जण जेवण करून झोपी गेले. कोणीतरी दरवाजा ठोठावला म्हणून निशिकांत यांनी दार उघडताच दोन दरोडेखोर घरात शिरले. ‘चलो, पैसा, सोना निकालो. जो भी है, दे दो’ असे म्हणत घरातील सर्वच सदस्यांना वेठीस धरले. ख्रिस्टिना आणि तिची दोन भावंडे एका ठिकाणी बसून होती. दरोडोखोरांपैकी एकाने आतल्या खोलीत जाऊन कुऱ्हाड आणि करवत आणली. करवत त्याने दुसऱ्या साथीदाराच्या हाती दिली. आधीच भेदरलेल्या ख्रिस्टिनाच्या गळ्यावर एका दरोडेखोराने करवत लावली. ‘हम गरीब है. पैसा, सोना कुछभी नही. हमे छोड दो’अशी विनंती तिने केली. पण ‘तुझे उठाके लेंगे’ असा दरोडेखोरांनी तिला दम भरला. आता काही तरी हालचाल केल्याशिवाय गत्यंतर नाही हे लक्षात आल्यावर बहिणीसाठी लढा देण्याचा निर्धार मेशक आणि यशने केला. अंदाज घेत मेशकने थोडी हालचाल केली. त्याची हालचाल दिसताच एका दरोडेखोराने त्याच्यावर कुऱ्हाडीचा वार केला, पण मेशकने मोठ्या धिराने ती रोखली. भावाचा हा धाडसीपणा पाहताच यशनेही दुसऱ्याचा प्रतिकार केला. आपल्यावर वार होणार असल्याचे दिसताच त्याने करवत हातावर झेलली. प्रतिहल्ला होत असल्याचे दिसताच दरोडेखोरांनी तेथून पळ काढला.
बहिणीला वाचवण्यासाठी ते दरोडेखोरांशी लढले!
By admin | Published: July 09, 2015 2:44 AM