रत्नागिरी : गणपतीपुळे समुद्रात बुडणाऱ्या औरंगाबादच्या आठ अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना गुरुवारी सकाळी वाचविण्यात आले आहे. ते बुडत असताना ग्रामपंचायतीचे सुरक्षारक्षक व जयगणेश एकात्मिक ग्रामीण सहकारी संस्थेचे जीवरक्षक विश्वास सांबरे यांनी समुद्रात उडी घेतली आणि त्यांना बाहेर काढले. या आठ जणांमध्ये रेणुका अंधारकर (१९), भक्ती शामेंद्रकर (१९), समृद्धी सबनीस (१९), श्रद्धा गायकवाड (१९), श्रीरंग जायबाय (१९), सुमित पाठक, चंद्रकांत कांबळे (२१) व सचिन त्रिंबकराव गिरगे (२१) यांचा समावेश होता.औरंगाबादच्या ४० विद्यार्थ्यांचा ग्रुप गुरुवारी गणपतीपुळे येथे आला होता. देवदर्शन करण्यापूर्वी हे सर्व जण सकाळी आठच्या सुमारास गणपतीपुळे येथे समुद्रात उतरले. त्यातील आठ जण खोल समुद्रात जात होते. या आठ जणांना येथील स्थानिक छायाचित्रकार व व्यावसायिकांनी पाहिले आणि त्यांनी तत्काळ याबाबत गस्त घालत असलेले जीवरक्षक विश्वास सांबरे यांना माहिती दिली. दरम्यान या विद्यार्थ्यांनीही आरडाओरडा सुरू केला. त्यानंतर सांबरे यांनी तत्काळ पाण्यात झेपावत सर्वांना सुखरूप पाण्याबाहेर काढले. (वार्ताहर)
बुडणाऱ्या आठ विद्यार्थ्यांना वाचविले
By admin | Published: October 30, 2015 1:28 AM