ऑनलाइन लोकमत
महाड, दि. 5 - अपघातामुळे चर्चेत आलेला रायगडच्या महाडमधील सावित्री नदीवरील पूल पुन्हा नव्याने उभा राहिला आहे. केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या नव्या पुलाचं उद्घाटन करण्यात आलं. विशेष म्हणजे पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी १८० दिवसांची (सहा महिने) मुदत देण्यात आली असताना पाच महिन्यांमध्येच हे काम पूर्ण झाले आहे.
गतवर्षी 3 ऑगस्ट रोजी मुसळधार पावसात सावित्री नदीवरचा पूल वाहून गेला होता. या दुर्घटनेत दोन एसटी बस आणि एक तवेरा गाडी बुडाली. तर सर्वच्या सर्व 40 जणांचा मृत्यू झाला होता.
दुर्घटनेनंतर नितीन गडकरी यांनी सहा महिन्यात नवा पूल उभारण्याची घोषणा केली होती.त्यानुसार हा तीन पदरी आणि 239 मीटर लांबीचा पूल बांधून तयार झाला असून आजपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.
CM @Dev_Fadnavis and @nitin_gadkari to inaugurate major bridge across Savitri River pic.twitter.com/Nix91wZVnw— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 5, 2017
हा पूल बारा गाळ्यांचा, तीन पदरी आणि पदपथासह सोळा मीटर रुंदीचा आहे. साधारणत: या मोजमापाचा पूल पूर्ण होण्यास किमान दोन वर्षांचा कालावधी लागतो. मात्र या पुलाचे महत्त्व विचारात घेत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी १८० दिवसांत पूल उभा करण्यात येईल असे जाहीर केले होते. निविदेमध्येही तशी अट टाकण्यात आली होती. एल अँड टी या ठेकेदार कंपनीने हे आव्हान स्वीकारत तीन पाळ्यांमध्ये रात्रंदिवस काम करून पाच महिन्यांमध्येच हे काम पूर्ण केले. या पुलाच्या बांधकामासाठी 35.77 कोटी रुपयांचा खर्च आला आहे.