ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 25 : सावित्री पुलाच्या दुर्घटनेनंतर राज्यातील शिवकालीन, ब्रिटीशकालीन पुलांची तपासणी करण्यात आली असून, यामध्ये तब्बल २१०० पूल धोकादायक असल्याचे समोर आले आहे. यामध्ये शंभर पुलांची तातडीने दुरुस्ती करण्याची गरज आहे. पुलांची ही स्थिती लक्षात घेऊन यापुुढे देखभाल दुरुस्तीसह अन्य सर्वच कामांसाठी स्वंतत्र विभाग स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे केली.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने पुलांची तपासणी, देखभाल-दुरुस्ती व संनियंत्रण या विषयावर कार्यरत वरिष्ठ अभियंत्यांसाठी यशदा येथे चर्चासत्र झाले. चर्चासत्राचे उद्घाटन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. यानंतर पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या वेळी बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आशिष सिंग, सचिव (इमारती) सी. पी. जोशी, सचिव (रस्ते) एस. डी. तामसेकर, सेवानिवृत्त सचिव के. एस. जांगडे, मुख्य अभियंता प्रवीण किडे सहभागी झाले होते. याशिवाय अनेक अनुभवी संस्था, संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
पाटील यांनी सांगितले की, सावित्री दुर्घटनेनंतर पुलांचा विषय शासनाने गाभीर्याने घेतला आहे. यासाठी हे चर्चासत्र संपल्यानंतर तज्ज्ञ तीन-चार व्यक्तींची समिती स्थापन करण्यात येणार असून, राज्यातील धोकादायक पुलांची पुढील दिशा ठरविण्यासाठी खास उपाययोजना करण्यात येणार आहेत. तसेच इमारत, रस्त्यांप्रमाणेच आता पूल असा स्वतंत्र विभाग सुरु करण्यात येणार आहे. या विभागामार्फत नवीन पुलांचे डिझाईन करणे, बांधकामांचे नकाशे, प्रत्येक काम सुरु असताना देखरेख करणे, निकषानुसार काम होते किंवा नाही यांची तपासणी करण्यात येणार आहे.
तसेच या विभागामार्फत वर्षांतून दोन वेळा सर्व पुलांची तपासणी करून येणारा अहवाल सर्वांसाठी खुला करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. शासनाच्या वतीने करण्यात आलेल्या तपासणीमध्ये २१०० पूल धोकादायक असल्याचे म्हटले आहे. यामध्ये शंभर पुलांची तातडीने दुरुस्ती करण्याची गरज आहे. या पुलांच्या कामासाठी किंती निधी लागले हे काढण्याचे काम सुरु आहे. डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये यासाठी अधिक निधीची मागणी करण्यात येणार असून, मे २०१७ पर्यंत सर्व पुलांची दुरुस्ती करण्यात येईल, असे आश्वासन पाटील यांनी दिले.