महाड : तब्बल दहा दिवसांनंतर सावित्री पूल दुर्घटनेत नदीच्या प्रवाहात वाहून गेलेल्या तीन वाहनांपैकी राजापूर-बोरीवली एसटी बसचा शोध घेण्यात नौदलाच्या पथकाला गुरुवारी यश आले. मात्र बेपत्ता झालेल्या १५ प्रवाशांचा अद्यापही तपास न लागल्याने या यंत्रणेवरील तणाव कायम आहे.गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास दुर्घटनेच्या ठिकाणापासून दोनशे मीटर अंतरावर खोल पाण्यात शोध घेणाऱ्या नौदलाच्या पथकाला या बसचा शोध लागला. पाण्यात अंदाजे पंधरा ते वीस फूट खोल गेलेल्या पाणबुड्यांना पाण्याखाली बस असल्याचे आढळून आले. याबाबतचे वृत्त पसरताच प्रशासकीय यंत्रणेनेही बस बाहेर काढण्यासाठी धावपळ सुरू केली. बस पाण्याबाहेर काढण्यासाठी नदी किनाऱ्यावर तीन क्रेन्स व तीन जेसीबी यंत्र आणले होते. दुपारी एक वाजता बस बाहेर काढण्यासाठी प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली, मात्र तांत्रिक अडचणीमुळे ती बस बाहेर काढण्यास विलंब लागला. सायंकाळी पाच वाजता एनडीएफ शासकीय यंत्रणा तसेच तांत्रिक कर्मचाऱ्यांना सुमारे शंभर मीटर अंतरावरील ही पाण्यातील बस किनाऱ्यावर आणण्यात यश आले. या बसचा केवळ सांगाडा शिल्लक राहिला होता तर बसचे संपूर्ण छप्पर तुटून वाहून गेले होते. राजापूर-बोरीवली या बसमध्ये बेपत्ता प्रवाशांचे मृतदेह सापडतील अशी चर्चा केली जात होती, मात्र ती फोल ठरली. दुर्घटनेनंतर जोरदार प्रवाहात वाहून गेलेल्या या बस तेथील खडकांवर आदळून त्यावेळी बसचे छप्पर बसपासून मोकळे झाले असेल व त्याचक्षणी बसमधील प्रवासी वाहून गेल्याच्या शक्यतेला आज पुष्टी मिळाली.या राजापूर बसमधील सात, जयगड एसटी बसमधील तीन तर तवेरा जीपमधील पाच जणांचा अद्यापही शोध लागला नाही. गेल्या चार दिवसांपासून एकाही बेपत्ता प्रवाशाचा मृतदेह न सापडल्याने त्यांचे मृतदेह सापडण्याची शक्यता आता पूर्णपणे मावळली असल्याचे बोलले जात आहे. मात्र एनडीआरएफच्या पथकाने शोधकार्य सुरूच असल्याचे दिसून आले.आमच्या प्रयत्नांना यश आलेनौदलाचे चिफ पीडी आॅफिसर त्रिलोकसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली पाणबुडे व जवानांचे पथक दहा दिवसांपासून शोधमोहिमेत सहभागी असून नौदलाकडून त्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. पहाटे पाच वाजल्यापासून गुरु वारी शोधमोहीम सुरू केल्याचे त्रिलोकसिंग यांनी सांगितले. उद्यापर्यंत दुसरी वाहने देखील शोधण्यासाठी ही मोहीम अधिक तीव्र राबवणार असल्याचे सांगून आमच्या प्रयत्नांना नक्की यश मिळेल असा ठाम विश्वास नौदलाचे चिफ पीडी आॅॅफिसर त्रिलोकसिंग व्यक्त के ला.
सावित्री पूल दुर्घटना - वाहून गेलेल्या एसटीचा लागला शोध
By admin | Published: August 12, 2016 4:21 AM