महाड : सावित्री पूल दुर्घटनेला मंगळवारी सात दिवस उलटून गेले तरी बेपत्ता १५ प्रवाशांचा शोध अद्यापही लागलेला नाही. शोध लवकर लागेल या आशेवर गेल्या आठ दिवसांपासून दुर्घटनानजीकच्या मदत केंद्रात तळ ठोकून असलेल्या नातेवाइकांमध्ये प्रशासनाबाबत प्रचंड चीड निर्माण झाल्याचे दिसून आले. आम्ही कंटाळून कधी एकदा इथून जातोय याची जणू प्रशासन आता वाट पाहातेय, मात्र बेपत्ता प्रवाशांचा शोध लागल्याशिवाय या ठिकाणाहून हलणार नाही, असा इशाराच या संतप्त नातेवाइकांनी पत्रकारांशी बोलताना दिला. गेल्या सात दिवसांपासून बेपत्ता वाहनांचा तसेच प्रवाशांचा शोध घेण्याचे काम एनडीआरएफ, नौदलाच्या जवानांकडून केले जात आहे. यासाठी अत्याधुनिक यंत्रणा कार्यरत करुनही तसेच नदी पातळी कमी होवून देखील वाहून गेलेल्या तिन्ही वाहनांचा छडा या यंत्रणेला लागू शकला नाही. याबद्दल या नातेवाइकांनी आश्चर्य व्यक्त केले. आम्ही सर्व नातेवाईक रायगडच्या जिल्हाधिकारी शीतल उगले यांना भेटण्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून वेळ मागत आहोत, मंत्र्यांबरोबर दुर्घटनेच्या ठिकाणी नियमित येत आहेत. मात्र त्यांनी या ठिकाणी मदत केंद्रात असलेल्या बेपत्ता प्रवाशांच्या नातेवाइकांना भेटून साधी विचारपूस देखील त्यांनी आजपर्यंत केलेली नाही, नक्की शोधकार्य कशा पध्दतीने सुरू आहे. शासनाला त्या अहवाल काय पाठवतात याची माहिती आम्हाला त्यांना विचारायची आहे. मात्र त्या आमची भेट घेण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप प्रमोद सुर्वे यांनी केला. रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर या दुर्घटनेच्या ठिकाणी येवून गेले. दुर्घटनेतील बहुतांश प्रवासी हे रत्नागिरी जिल्ह्यातील होते. त्यांचे मदत केंद्रात येवून बेपत्ता प्रवाशांच्या नातेवाइकांची भेट घेवून विचारपूस करणे अपेक्षित होते, मात्र आमच्याशी वायकर यांनी कुठलाही संवाद साधलेला नाही. रत्नागिरीचे पालकमंत्री म्हणून त्यांनी आम्हाला भेटून दिलासा द्यायला हवा होता. मात्र वायकर यांनी हे सौजन्य दाखवलेले नाही, त्याबद्दलही या संतप्त नातेवाइकांनी वायकर यांच्याबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. (वार्ताहर)दासगाव : सावित्री नदीतील पूल दुर्घटनेला आता सात दिवस उलटले तरी आजही जवळपास १५ व्यक्ती बेपत्ता आहेत. प्रशासन त्यांच्या परीने शोध घेत आहे. मात्र मृतदेह तसेच वाहने अद्याप मिळत नसल्याने नातलग हवालदिल झाले आहेत. त्यांना आधार देण्याकरिता आ.भरत गोगावले यांनी रविवारी सायंकाळी भेट घेवून सरकार हरलेले नाही, प्रशासन शर्थीचे प्रयत्न करीत आहे अशा शब्दात दिलासा दिला.या दुर्घटनेला सात दिवस झाले असले तरी दुर्घटनेतील अद्याप १५ मृतदेह सापडलेले नाहीत. त्यांचे नातेवाईक मदत केंद्रात शोध कामाकडे आस लावून बसले आहेत. एन.डी.आर.एफ.चे जवान आणि इतर शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. सुरवातीच्या दोन दिवसांत दासगाव आणि खाडीत मृतदेह सापडले मात्र त्यानंतर सावित्रीचे पाणी ओसरून देखील मृतदेह आणि वाहनांचा शोध लागू शकलेला नाही. यामुळे नातेवाईक हवालदिल झाले आहेत. त्यांना शासन आणि प्रशासन कोणते प्रयत्न करीत आहे याची माहिती देण्याकरिता आ.गोगावले यांनी नातेवाइकांची भेट घेतली. या वेळी त्यांनी शासन हरलेले नाही, प्रशासन सर्व प्रयत्न करीत असल्याचे सांगून आतापर्यंत सर्व तंत्रज्ञान वापरून शोध कसा घेतला याची माहिती देखील गोगावले यांनी दिली. या वेळी उप जिल्हा पोलीस अधीक्षक गायकवाड, प्रांताधिकारी सातपुते, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रांजली सोनावणे, तहसीलदार संदीप कदम, एन.डी.आर.एफ. तसेच नेव्हीचे अधिकारी उपस्थित होते.
सावित्री पूल दुर्घटना - बेपत्ता प्रवाशांचे नातेवाईक प्रशासनावर नाराज
By admin | Published: August 10, 2016 4:42 AM