महाड : सावित्री दुर्घटनेतील १५ बेपत्ता प्रवाशांचा शोध घेण्यात सोमवारी सहाव्या दिवशीही अपयश आल्याने या बेपत्ता प्रवाशांच्या संतप्त नातेवाइकांनी विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांच्यासमोर शासन यंत्रणेबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त के ली. आता आमच्या भावनांशी शासनाने खेळू नये. शासकीय यंत्रणा केवळ व्हीआयपी आणि मंत्री महोदयांच्या पाहुणचारात गुंतलेली आहे असा आरोप करीत या संतप्त व शोकाकुल नातेवाइकांनी रास्ता रोको करण्याचा इशारा दिला.उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी सोमवारी सायंकाळी सावित्री पूल दुर्घटनास्थळी भेट देवून या दुर्घटनेत मृत पावलेल्या तसेच बेपत्ता झालेल्या प्रवाशांच्या नातेवाइकांचे सांत्वन केले. राजापूर येथील प्रमोद सुर्वे यांना याबाबत तीव्र शब्दात संताप व्यक्त करताना अश्रू अनावर झाले. याठिकाणी येणारे मंत्री महोदय केवळ पुलाजवळ फोटो सेशन करून मीडियाशी बोलून जात आहेत. मात्र एकाही मंत्र्याने बेपत्ता प्रवाशांच्या नातेवाइकांची याठिकाणी भेट घेतलेली नाही, शोधकार्य करणारे एनडीआरएफचे जवान आता मृतदेह शोधूनही सापडत नसल्याने थकलेले आहेत, त्यामुळे केंद्र शासनाने याठिकाणी नव्याने फौज पाठवून शोधकार्य करावे, अशी मागणीही या नातेवाइकांनी ठाकरे यांच्याकडे केली.मृतांच्या व बेपत्ता प्रवाशांच्या नातेवाइकांची प्रशासनाने कुठलीही सोय केलेली नाही तर मुस्लीम समाजाच्या अंजुमन दुर्दबंद ट्रस्ट व एमएमएने आमची सोय केल्याने या नातेवाइकांनी सांगताना शासनाच्या निष्क्रियतेवर कडक शब्दात ताशेरे ओढले, मात्र ठाकरे यांनी या सर्व नातेवाइकांची समजूत काढत धीर दिला. प्रशासनाने परिस्थितीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी स्पष्ट केले. याबाबत उपसभापती म्हणून आपण शासनाला कठोर पावले उचलण्यास भाग पाडू असेही ठाकरे म्हणाले. (वार्ताहर)महाड : सावित्री पूल दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या ४१ प्रवाशांपैकी २७ प्रवाशांचे मृतदेह विविध ठिकाणच्या किनाऱ्यावर सापडले असले तरी उर्वरित १५ बेपत्ता प्रवाशांचा अद्याप तपास लागत नसल्याने प्रशासकीय यंत्रणा आणि शोधकार्य करणाऱ्या पथकासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे, सहा दिवस झाले तरी बेपत्तांचा तपास लागत नसल्याच्या चिंतेने मदत केंद्रात ठाण मांडून बसलेल्या त्यांच्या नातेवाइकांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.च्या दुर्घटनेत तवेरा जीपमधील पाच, जयगड-मुंबई एसटी बसमधील तीन तर राजापूर-बोरीवली एसटी बसमधील सात प्रवासी अद्याप बेपत्ता आहेत. त्यांच्यासह बेपत्ता वाहनांचा छडा देखील लागत नसल्याने प्रशासनही हतबल झाले आहे. सोमवारी दुर्घटनेनंतरच्या सहाव्या दिवशी शोधमोहीम सुरू असली तरी सोमवारी एकही मृतदेह सापडला नसल्याने घटनेच्या दिवशी वाहणाऱ्या नदीच्या जोरदार प्रवाहासोबत उर्वरित प्रवाशांचे मृतदेह दूरवर समुद्रात वाहून गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. बेपत्ता वाहनांचा शोध घेण्यासाठी घटनास्थळापासून तीन किमी अंतराच्या पल्ल्यातील प्रवाहात शोध पथकाने संपूर्ण लक्ष केंद्रित केले आहे. दरम्यान, बेपत्ता वाहनांचा शोध लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोनार टेक्नॉलॉजीचा वापर करूनही नदीतील वाहनांचा शोध घेण्यात यंत्रणेला अपयश आल्याचे दिसून येत आहे. (वार्ताहर)
सावित्री पूल दुर्घटना : नातेवाइकांचा रास्ता रोकोचा इशारा
By admin | Published: August 09, 2016 4:00 AM