ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 17 - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदी विद्यापीठातील पर्यावर्णशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. एन. आर. करमळकर यांची निवड करण्यात आली आहे. राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी करमळकर यांच्या नियुक्तीबाबतची घोषणा केली आहे.
कुलगुरूपदाच्या अंतिम मुलाखती मंगळवारी राजभवनात पार पडल्या. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी या मुलाखती घेतल्या. राज्यपालांकडून कुलगुरूपदी कुणाची निवड केली जाते आणि राजभवनातून त्याची घोषणा केव्हा होते याकडे सगळयांचे लक्ष लागले आहे.
विद्यापीठातील आरोग्य विज्ञान विभागाचे प्राध्यापक डॉ. भूषण पटवर्धन, भौतिकशास्त्र विभागाच्या प्रमुख अंजली क्षीरसागर, पर्यावरणशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. एन. आर. करमळकर, मुंबईच्या रूईया कॉलेजचे प्राचार्य सुहास पेडणेकर, मुंबईच्या रसायनशास्त्र तंत्रज्ञान संस्थेचे प्राध्यापक डॉ. ए. बी. पंडित यांनी मंगळवारी मुलाखती दिल्या होत्या.
राज्यपालांनी प्रत्येक उमेदवाराला मुलाखतीसाठी दहा मिनिटांचा वेळ दिला होता. विद्यापीठाच्या विकासाबाबत तुमचे व्हिजन काय? अशी विचारणा राज्यपालांकडून उमेदवारांना करण्यात आली होती.विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांचा कार्यकाळ सोमवारी समाप्त झाला. त्यानंतर शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू देवानंद शिंदे यांच्याकडे अतिरिक्त पदभार सोपवण्यात आला होता.
ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखालील कुलगुरू शोध समितीकडे ९० उमेदवारांचे अर्ज आले होते. त्या अर्जांची छाननी करून समितीने ३२ उमेदवारांना मुलाखतीसाठी पाचारण केले. त्यातून ५ जणांची शॉर्टलिस्ट तयार करून समितीने राज्यपालांकडे सोपविली. या समितीमध्ये काकोडकर यांच्यासह जयपूर येथील मालवीय राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेचे संचालक प्रा. उदयकुमार आर. यरागट्टी व सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांचा समावेश होता.
डॉ. नितीन करमळकर यांचा परिचय
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे नवनिर्वाचित कुलगुरू डॉ. नितीन करमळकर हे गेल्या २५ वर्षांपासून अध्यापनाचे काम करीत आहेत. भूगर्भशास्त्र आणि भूरसायनशास्त्र हे त्यांच्या संशोधनाचे विषय आहेत. गेल्या काही दिवसांपासून पर्यावरणशास्त्र विभागाच्या प्रमुख पदाचा अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडे सोपवण्यात आला होता. विद्यापीठाच्या अनेक समितींवर त्यांनी काम पाहिले आहे.