पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवरही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विभागातील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून विद्यापीठाकडून घेतल्या जाणा-या प्रवेश पूर्व परीक्षेसाठी आत्तापर्यंत सुमारे २५ हजार विद्यार्थ्यांचे अर्ज आले आहेत. विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेस अर्ज करण्यासाठी १० ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा अधिक अर्ज येणार आहेत. त्यामुळे प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये चांगलीच स्पर्धा निर्माण झाल्याचे दिसून येईल,असे विद्यापीठातील अधिका-यांकडून सांगितले जात आहे.
विद्यापीठातील विविध शैक्षणिक विभागातील प्रवेशासाठी विद्यापीठ प्रशासनाकडून ऑनलाइन प्रवेश परीक्षा घेतली जाते. तसेच संबंधित विभागांकडून गुणवत्ता यादी प्रसिद्ध करून त्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जातात.सध्या अंतिम वर्षाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला नसला तरी विद्यापीठाने विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.मागील वर्षी विद्यापीठाकडे २५ हजार अर्ज आले होते. मात्र, आत्ताच अर्जांची संख्या २५ हजाराहून अधिक झाली आहे. तसेच त्यात दहा अर्जांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
पुणे विद्यापीठात वाणिज्य व व्यवस्थापन, मानव्य विज्ञान, आंतरविद्याशाखीय अभ्यास आणि विज्ञान-तंत्रज्ञान या चार विद्याशाखांमधील पदव्युत्तर पदवी, पदवी आणि प्रमाणपत्र पदविका अभ्यासक्रमासाठी सुमारे ६ हजार जागा उपलब्ध आहेत.यंदा करोनामुळे प्रवेशास अर्ज कमी येतील, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, इतर विद्यापीठाच्या तुलनेत पुणे विद्यापीठाचे शुल्क कमी आहे.विद्यापीठात वसतिगृहाची चागली सुविधा आहे.तसेच विद्यापीठाकडून विविध शिष्यवृत्ती दिल्या जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून विद्यापीठातील प्रवेशास चांगला प्रतिसाद मिळत आहे.
...................विद्याशाखा प्राप्त प्रवेश अर्ज प्रवेश क्षमता
विज्ञान आणि तंत्रज्ञान : १५८३० १३४२
वाणिज्य व व्यवस्थापन : ९४२ २२०
मानवविज्ञान : ४४९९ ११७५
आंतर-विद्याशाखीय अभ्यास : १२२३ ६१६
एकूण : २२४६७ ३३५३
पदविका व प्रमाणपत्र : २७६१ २३००