ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 3 - ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आज संपूर्ण महाराष्ट्रात साजरी होत असून सर्च इंजिन गुगलनेही याची दखल घेतली आहे. गूगलने डूडलच्या माध्यमातून सावित्रीबाई फुले यांना आदरांजली वाहिली आहे. सावित्रीबाई फुलेंची आज 185 वी जयंती साजरी होत आहे. सावित्रीबाई फुले (जानेवारी 3, इ.स. 1831 – मार्च 10, इ.स. 1897) या मराठी शिक्षणप्रसारक, समाजसुधारक महिला होत्या. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती ज्योतिराव फुले यांच्यासह त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली.
भारतातील आद्य मुख्याध्यापिका, आद्य शिक्षिका, समाजसुधारक म्हणून सावित्रीबाई फुले यांचे कार्य प्रेरणादायी आहे. उपेक्षित महिलांचे शिक्षण व अन्याय, अत्याचार, अनिष्ठ रुढींच्या विरोधात अखंड संघर्ष करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगावात झाला.
महाराष्ट्रातील सामाजिक क्रांतीचे जनक, दलितांचे उद्घाटक व सत्यशोधक समाजाचे संस्थापक महात्मा जोतिराव फुले यांचे सोबत सावित्रीबाईचा 1840 साली विवाह झाला. ते मिशनऱ्यांच्या शाळेत इंग्रजी शिकले होते. शिक्षणामुळे झालेल्या जागृतीने समाजातील तीव्र विषमतेचे प्रखर भान येऊन त्यांनी आपले जीवन तळागळातील जनतेचे शैक्षणिक परिवर्तन व त्यांचा सामाजिक पातळीवर उद्धार करण्यासाठी खर्ची घालायचे ठरविले. सावित्रीबाईंनी जोतीरावांच्या बरोबरी ने समाजसेवेचा वसा घेतला. मुलींनी शिकावे म्हणून त्यांनी शाळा सुरु केल्या. त्यांच्या या सुधारणेच्या कामावर त्यांच्या कुटुंबाची वाईट प्रतिक्रिया आली. त्यांचा परिणाम संबंध तोडण्यावर झाला. समाजानेही फुले दाम्पत्याच्या पुरोगामी पणासाठी अतिशय छळ केला.परंतु फुले दाम्पत्य थोडे देखील आपल्या ध्येयापासून विचलित झाले नाहीत. कारण त्यांनी सामाजिक क्रांतीचे कार्य हे जाणीवपूर्वक अंगिकारले होते. त्यांच्या जीवनाचा तो एक भाग झाला होता.
ज्योतीरावांच्या शिक्षण कार्यात सहकार्य करण्यासाठी सावित्रीबाई प्रथम स्वत: शिकल्या, अध्यापनाचे धडे घेतले. त्यानंतर शाळांचे व्यवस्थापन आणि अध्ययन करु लागल्या. स्त्री शिक्षणाचे कार्य त्यांनी चांगल्या प्रकारे पुढे नेले. त्यांनी कामगारांसाठी रात्रशाळा काढल्या. तेथेही अध्यापक करीत देवदासी पद्धत बंद करणे, बालविवाहाला बंदी करणे, केशवपनाची पद्धत बंद करणे, विधवा विवाहाला असलेल्या बंदीविरुद्ध सामाजिक जागृती करणे इत्यादीच्या परिवर्तनासाठी त्यांनी सामाजिक जागृती केली. त्यांनी समाजप्रबोधन करण्यासाठी शिक्षणाचे महत्व पटवून देण्यासाठी कविता रचल्या. त्यांच्या काव्याचे विषय सामाजिक आहेत. त्यात जातीभेद निर्मूलन, स्त्री शिक्षणाचे महत्व, विधवा विवाह, बालविवाह, शूद्रा अतिशूद्रांसाठी शिक्षण ते होते.
सावित्रीबाई समाज प्रबोधन व समाज जागृतीसाठी सर्व सामान्यांना समजेल अशा भाषेत गद्य, पद्य, पत्रे, भाषणे आणि गाणी इत्यादींच्या माध्यमातून विचार मांडलेत. उपेक्षित स्त्रिया, कामगार आणि समाजातील खालच्या स्तरातील घटकांना अज्ञान व दारिद्रयाच्या अंधारातून बाहेर काढणे, त्यांना स्वाभिमान व स्वावलंबी बनविणे, त्यांच्यावर होणारे समाजिक अन्याय, अत्याचार दूर व्हावेत, अंधश्रद्धा, रुढी नष्ट होऊन त्यांच्या विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनातून निर्माण व्हावा. यासाठीच सावित्रीबार्इंनी देह व लेखणी झिजवली.
इ.स. १८९६-९७ दरम्यान पुणे व परिसरात प्लेगच्या साथीने धुमाकूळ घातला. हा जीवघेणा आजार अनेकांचे जीव घेत होता. हा रोग संसर्गजन्य आहे हे कळल्यावर ब्रिटिश शासनाने जबरदस्तीने संभाव्य रुग्णांना वेगळे काढून स्थानांतरित करण्याचा खबरदारीचा उपाय योजला. यातून उद्भवणारे हाल ओळखून सावित्रीबाईंनी प्लेगपीडितांसाठी पुण्याजवळ वसलेल्या ससाणे यांच्या माळावर दवाखाना सुरू केला. त्या रोग्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना आधार देऊ लागल्या. प्लेग रुग्णांची सेवा करताना सावित्रीबाईंनाही प्लेग रोगाची लागणी झाली. या रोगामुळे त्यांचे 10 मार्च 1897 रोजी त्यांचे निधन झाले.