मुंबई : राष्ट्र सेवा दलातर्फे देण्यात येणाºया ‘सावित्रीच्या लेकी’ आणि सावित्री संस्था पुरस्कारांची घोषणा सोमवारी झाली आहे. यामध्ये ‘सावित्रीच्या लेकी’ पुरस्कारासाठी राज्यातील शेतकºयांच्या प्रश्नांवर लढणाऱ्या प्रतिभा शिंदे यांच्यासह माहुल प्रश्नावर लढा देणाऱ्या अनिता ढोले आणि कौमार्य चाचणी प्रथेविरोधात लढणाºया प्रियांका तमायचीकर या तिघींची निवड करण्यात आली आहे. दादर येथील छबिलदास शाळा सभागृहात ३ जानेवारी, २०१९ला सायंकाळी ६.३० वाजता पार पडणाऱ्या कार्यक्रमात या पुरस्कारांचे वितरण केले जाईल.
सातपुड्याच्या जंगलात जल, जंगल आणि जमीन या प्रश्नांवर आदिवासी शेतकºयांमध्ये काम करण्याचे काम प्रतिभा शिंदे करत आहेत. त्यांच्या नेतृत्त्वाखाली नुकत्याच निघालेल्या ठाणे ते मुंबई अशा लाँग मार्चने आदिवासी शेतकऱ्यांचे प्रश्न लोकांसमोर मांडले होते. दुसरीकडे मुंबईतील झोपडपट्ट्यांमधील लोकांचे माहुल येथे झालेले पुनर्वसन आणि तेथील प्रदूषणामुळे अनेक लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. माहुलमधील प्रकल्पग्रस्तांच्या नरक यातना समाजासमोर आणून संघर्ष जिवंत ठेवण्याचे काम अनिता ढोले करत आहेत. तर प्रियांका तमायचीकर या लग्नाच्या पहिल्या रात्री होणाºया कौमार्य चाचणी या प्रथेविरोधात संघर्ष करत आहेत. सामाजिक कार्यात ठसा उमटवणाºया या तिन्ही रणरागिणींना ‘सावित्रीच्या लेकी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
राष्ट्र सेवा दल, मुंबईचे कार्याध्यक्ष शरद कदम यांनी सांगितले की, जेष्ठ नाटककार रत्नाकर मतकरी, अपना सहकारी बँकेचे अध्यक्ष दत्ताराम चाळके, अभिनेत्री चिन्मयी सुमीत, जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या छबिलदास शाळेचे कार्याध्यक्ष शैलेंद्र साळवी, जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक डॉ. जी.जी. पारीख, छबिलदास शाळेचे नंदकुमार इनामदार, अरविंद पार्सेकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडेल. सावित्रीच्या लेकी पुरस्काराबरोबर संयुक्त नवी चाळ आणि लोकमान्य विद्या मंदिर यांना ‘सावित्री संस्था पुरस्कार’ देण्यात येणार आहे. याशिवाय राष्ट्र सेवा दलाच्या गोरेगाव, सातरस्ता आणि मालाड-मालवणी केंद्राना विशेष पुरस्काराने या वेळी गौरविण्यात येणार आहे.
यावेळी प्रसिध्द लावणी नृत्यांगना आकांक्षा कदम, राष्ट्र सेवा दल, सातरस्ता शाखेचे स्त्री जागर नृत्य याचे नृत्य, मालवणी शाखेचे स्किट, छबिलदास शाळेतील ज्युनियर कॉलेजमधील मुला-मुलींचे नृत्य सादर केले जाणार आहे.