जितेंद्र ढवळे,सावनेर Maharashtra Vidhan Sabha 2024: २०१४ मध्ये देशमुख काका-पुतण्याच्या लढाईने काटोलची निवडणूक राज्यभरात गाजली. आता भाजपचे डॉ. आशिष देशमुख, त्यांचे सख्खे भाऊ डॉ. अमोल देशमुख आणि काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या पत्नी अनुजा यांच्या लढतीने सावनेर मतदारसंघाची निवडणूक चर्चेत आहे. देशमुख भावंडे आपसात लढत असले तरी सावनेरमध्ये खरा मुकाबला हा भाजप विरुद्ध काँग्रेस, असा होताना दिसतो आहे.
जिल्हा बँक घोटाळ्यात शिक्षा झाल्यानंतर सुनील केदार यांना यावेळी निवडणूक लढविण्यापासून वंचित राहावे लागले. त्यामुळे त्यांच्या पत्नी अनुजा यांना काँग्रेसने संधी दिली आहे. केदार यांच्या सावनेरमधील प्रस्थाला सुरुंग लावण्यासाठी भाजपने पुन्हा एकदा डॉ. आशिष देशमुख यांच्यावर विश्वास टाकला आहे. २००९ मध्ये आशिष देशमुख यांनी केदार यांना घाम फोडला होता. अवघ्या ३,४७२ मतांनी देशमुख यांचा पराभव झाला होता. यावेळी सावनेरचा मामला टफ झाला आहे. येथे १९ उमेदवार रिंगणात आहेत.
मतदारसंघातील कळीचे मुद्दे
जिल्हा बँक घोटाळ्यात केदार यांना शिक्षा झाल्यानंतर त्यांच्याकडून घोटाळ्याची रक्कम वसूल करण्यात यावी, हा मुद्दा घेत टीम भाजप मैदानात उतरली आहे.
१,६०,११४ महिला मतदार असलेल्या या मतदारसंघात ९० हजार महिलांना ‘लाडकी बहीण योजने’चा लाभ मिळाला आहे. त्यामुळे लाडक्या बहिणी सावनेरचा निकाल फिरवतील, असा भाजपचा विश्वास आहे.
या मतदारसंघात लोकसभेत काँग्रेसचे बर्वे यांना १६,६०९ मतांची आघाडी होती तर २०१९च्या विधानसभेत केदार यांना २६,२९१ मतांची आघाडी होती. काँग्रेसच्या मतांचा ग्राफ घसरलेला दिसतो आहे. रामटेकमध्ये झालेल्या बंडामुळे उद्धवसेना येथे अंतर राखून आहे.