ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 23 - आजच्या फ्लॅट संस्कृतीमध्ये कळवळा हरवला आहे. दुस-याचं दु:ख पाहून कळवळा येत नसेल तर त्याला माणूस कसं म्हणायचं असं मत जेष्ठ समाजसेवक डॉ.अनिल अवचट यांनी व्यक्त केले.
आर्टिस्ट्री आयोजित देणे समाजाचे या उपक्रमाचे उद्घाटन चाणक्य मंडलचे अध्यक्ष डॉ.अविनाश धमार्धिकारी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी अवचट प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.यावेळी आर्टिस्ट्रीच्या संयोजिका वीणा गोखले मंचावर उपस्थित होत्या.
सध्या समाजात पैसा म्हणजेच सर्वकाही असे तत्वज्ञान झाले आहे,पैसा माणसाला अतृप्त ठेवतो,तो कितीही मिळाला तरी कमी वाटतो. असेही अवचट पुढे म्हणाले. प्रदर्शनाविषयी बोलताना ते म्हणाले की समाजात चांगलं काम करणा-यांचा हा मेळा आहे.सामाजिक काम हेच खरं वैभव आहे,तुमचं सामाजिक काम हे किती छोटं आहे की मोठं हे महत्त्वाचं नसून त्या कामा मागील आत्मियता महत्त्वाची आहे.
सामाजिक संस्थांच्या मागे शासनाने उभं राहिलं पाहिजे असं मत डॉ.अविनाश धमार्धिकारी यांनी यावेळी व्यक्त केले.
आर्टिस्ट्रीतर्फे गेल्या १२ वर्षापासून सामाजिक संस्थांचे काम समाजासमोर आणण्यासाठी देणे समाजाचे या उपक्रमाअंतर्गत विविध सामाजिक क्षेत्रात काम करणा-या संस्थाची माहिती देणारे प्रदर्शन भरवण्यात येते. यंदा अशा संस्थांचे २७ स्टॉल असून त्यांच्या कार्याची माहिती समाजापर्यंत पोहचण्यास या उपक्रमाच्या माध्यमातून मदत होत आहे. हे प्रदर्शन २५ सप्टेंबर पर्यंत हर्षल हॉल कर्वे रस्ता येथे सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत सर्वांना पाहण्यास खुले आहे. उद्घटनाच्याच दिवशी या प्रदर्शनाला पुणेकरांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.