मुंबई : बांधकाम कामगारांच्या विशेष नोंदणी अभियानात अवघ्या ४० दिवसात तब्बल सव्वा दोन लाख कामगारांची नोंदणी करण्यात आली आहे. इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने राबविलेल्या या अभियानात मुंबई विभागातून सर्वाधिक ७६ हजार तर नाशिक विभागातून सर्वात कमी १८ हजार कामगारांनी नोंदणी केली आहे.कामगार कल्याण मंडळाकडून राबविण्यात येणा-या विविध कल्याणकारी योजनांच्या मिळविण्यासाठी बांधकाम कामगारांनी महामंडळाकडे रितसर नोंदणी करणे आवश्यक असते. जास्तीतजास्त कामगारांनी नोंदणी करावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कामगार मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या हस्ते ई-शुभारंभ करण्यात आला होता. ४० दिवस हे अभियान सुरू होते. नोंदणीकृत कामगारांना महामंडळाच्या २८ योजनांचा लाभ घेता येणार आहे. बांधकाम कामगारांची नोंदणी करताना गेल्या वर्षभरात ९० किंवा त्याहून जास्त दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र तसेच अनेक कागदपत्रे बांधकाम कामगारांकडून घेण्यात आले.मंडळाचे कामकाज गतिमान, पारदर्शक होण्यासाठी कामकाजाची एकात्मिक संगणकीय प्रणाली तयार करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांची नोंदणी संख्या वाढविण्यासाठी व त्यांना कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यासाठी मंडळाचे प्रयत्न आहेत.
सव्वादोन लाख बांधकाम कामगारांची नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 3:34 AM