पिंपरी : साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी केलेल्या अवमानकारक वक्तव्याची माफी मागत नाहीत, तोपर्यंत त्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल. या भूमिकेवर आपण ठाम असल्याचे खासदार अमर साबळे यांनी संमेलानाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी.डी.पाटील यांना सांगितले.निगडीतील विद्यार्थी साहित्य संमेलनात सबनीस यांनी पंतप्रधानांविषयी अनुद्गार काढले होते. त्याचे पडसाद मागील आठवड्यात उमटले. भाजपाने पिंपरीत सबनीसांच्या पुतळ्याचे दहन केले. आरपीआयचे नेते खासदार रामदास आठवले यांनीही संमेलन उधळून लावण्याचा इशारा दिला. मात्र, तरीही सबनीस यांनी दिलगिरी व्यक्त न केल्याने भाजपा कार्यकर्ते संतापलेले आहेत. पिंपरी येथे होणाऱ्या ८९व्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष पाटील निगडी येथील खासदार अमर साबळे यांच्या निवासस्थानी निमंत्रण देण्यासाठी आले होते. या वेळी खासदार साबळे आणि डॉ. पाटील यांची सुमारे अर्धा तास चर्चा झाली. त्या वेळी साबळे यांनी भावना व्यक्त केल्या. खासदार साबळे म्हणाले, ‘‘साहित्य संमेलन हे या देशातील साहित्य संस्कृतीचे व प्रज्ञावंतांचे पवित्र व्यासपीठ आहे. साहित्य चळवळ ही आदर्श चळवळ आहे. या आदर्श चळवळीतील त्या व्यासपीठावर असहिष्णू वृत्तीच्या अपवित्र व्यक्तीचे पाऊल पडू नये, ते व्यासपीठ कलंकित होऊ नये. भारतीय संस्कृतीप्रमाणे संमेलनाच्या स्वागताध्यक्षांचे स्वागत करून मी संमेलनाचे निमंत्रण स्वीकारले; परंतु संमेलनाध्यक्षांनी पंतप्रधानांविषयी अवमानकारक भाषा वापरल्यामुळे संमेलनाला उपस्थित राहणार नाही.’’ (प्रतिनिधी)
आंदोलनाच्या भूमिकेवर साबळे ठाम
By admin | Published: January 07, 2016 1:10 AM