विलास जळकोटकर
सोलापूर : जिथे ‘गमभन’ अक्षरे गिरवून उद्याची भावी पिढी घडण्याची स्वप्नं पाहायची अशा विद्यामंदिराच्या पडक्या भिंती, गळके छत, धोकादायक स्थिती असेल अशा ठिकाणी मुलांनी धडे कसे गिरवायचे. अशी अवस्था जिल्हा परिषदेच्या शाळांची दिसतेय. प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यात ६६४ शाळा धोकादायक ठरवून बंद करण्यात आल्या आहेत. प्रत्यक्षात तुटपुंजा निधी उपलब्ध झाल्यामुळे गुरुजींनी विद्यादानाचं कार्य रोखले जाऊ नये म्हणून मुलांना ग्रामपंचायतीच्या इमारती, अंगणवाड्यांमध्ये, शाळेच्या व्हरांड्यात बसवून विद्यादानकार्य आरंभिले. उद्या (सोमवार) पासून शाळा सुरु होताहेत़ यंदाच्या शैक्षणिक वर्षात ही अवस्था असेल असे दिसतेय.
एकीकडे शासन शिक्षणापासून वंचित घटकांना प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करत असताना दुसरीकडे धोकादायक वर्गखोल्यांमुळे विद्यार्थ्यांना उघड्यावर विद्याग्रहण करण्याची वेळ आलीय. जिल्ह्यातल्या २८०५ शाळांपैकी २१३ शाळांमधील तब्बल ६६४ वर्गखोल्यांचे सर्वेक्षण करुन त्या धोकादायक ठरवण्यात आल्या. पण, त्यासाठी पुरेसा निधी नसल्यामुळे त्याचा फटका काहीही दोष नसलेल्या मुलांना बसू लागलाय हे कोणी लक्षात घेणार की नाही? सोमवारपासूनच गावोगावच्या शाळेचा घंटा वाजणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेकडून निर्लेखित (धोकादायक) केल्या गेलेल्या शाळांची सद्यस्थिती ‘लोकमत’ने जाणून घेतली असता धक्कादायक वास्तव समोर आले.
जिल्हाभरातील सुमारे २१३ शाळांमधील धोकादायक बनलेल्या ६६४ वर्गखोल्यांचे निर्लेखन (वापर बंद) करण्यात आले आहे. त्यासाठी नवीन वर्गखोल्या आणि दुरुस्तीसाठी तब्बल ४४ कोटी ६७ लाख रुपयांची गरज आहे. नवीन २६४ खोल्यांची गरज आहे. ज्यांची दुरुस्ती करुन वापरात आणता येतील अशा ४४२ वर्गखोल्या आहेत. जिल्हा नियोजन विभागाकडून नवीन वर्गांसाठी ५ कोटी आणि दुरुस्तींसाठी ५ कोटी ५७ लाखांचा निधी मंजूर झालेला आहे. समग्र शिक्षा अभियानांतर्गत २४३ वर्गखोल्या बांधकामासाठी २९ कोटी ७५ लाख आणि ४४३ वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसाठी १४ कोटी ९२ लाख अशी एकूण ४४ कोटी ६७ लाखांची मागणी करण्यात आलेली आहे. सन २०१८-१९ या वर्षात केवळ ७ शाळांची दुरुस्ती झाली आहे. सध्या ८६ वर्गखोल्यांचे काम सुरु आहे. निधीची चणचण असल्याचे सांगण्यात येतेय.
अशा स्थितीत संबंधित धोकादायक वर्गखोल्यातील विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था गतवर्षीप्रमाणेच शाळेच्या व्हरांड्यात, ग्रामपंचायत, अंगणवाड्यांमध्ये करावी लागणार आहे.
जिल्हा परिषद शाळांमधील निर्लेखित करण्यात आलेल्या सर्व इमारती धोकादायक असून, यंदाच्या पावसाळ्यात यातील काही इमारती कोसळून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हा परिषदेला नियोजन आखावे लागणार आहे. दरम्यान निर्लेखित झालेल्या शाळांच्या वर्गखोल्यासंबंधी संबंधित शाळांचे मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत, गटशिक्षणाधिकाºयांना दिल्या आहेत. या परिसरात कोणी जाणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्यातरी अशा शाळांची दुरुस्ती न झाल्याने अनेक विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षात धोकादायक इमारतींमध्येच ज्ञानार्जन करावे लागणार आहे.
ही स्थिती आणखी किती महिने, वर्षे राहणार ? धोकादायक शाळांच्या जागा नव्या खोल्या केव्हा निर्माण होणार? अशा प्रश्नांचा सामना गावोगावच्या ग्रामस्थांकडून अनेक शाळांना भेटी दिलेल्या ‘लोकमत’च्या चमूंना करावा लागला.
तालुकानिहाय पाडकाम करावयाच्या शाळातालुका शाळा वर्गखोल्या संख्या संख्या
- अक्कलकोट १४ ३१
- बार्शी २० ४५
- करमाळा ११ ४०
- माढा १६ ७२
- माळशिरस ४८ १४२
- मंगळवेढा १७ ४७
- मोहोळ १२ ४१
- पंढरपूर ३४ ९६
- सांगोला २० ६४
- उ. सोलापूर १० ५९
- द. सोलापूर ११ २७