मुंबई : पर्यावरणाचा -हास लक्षात घेता आरे कॉलनीत मेट्रोचे कारशेड उभारण्यास पर्यावरणप्रेमींचा विरोध आहे. मात्र येथेच कारशेड उभारण्यासाठी मेट्रो प्रशासन आणि वन विभाग प्रयत्नशील आहे. यावर अभिनेते सयाजी शिंदे यांनी मधला मार्ग काढला. पर्यावरणाचा -हास टाळण्यासाठी येथे स्वत:हून झाडे लावण्यास पुढाकार घेतला. झाडे लावण्यासाठी वनविभागाला माती देण्याची विनंती केली होती. मात्र त्यांनी ती फेटाळली. माती हवी असल्यास आरे कॉलनीबाहेरून आणा, असे वनविभागाने सांगितले आहे.आरे कॉलनीचा भाग गिळंकृत करून त्या ठिकाणी मेट्रो प्रशासनाचा आरे कारशेड करण्याचा डाव पर्यावरणवाद्यांनी नुकताच राष्ट्रीय हरित लवादासमोर न्याय मागून उधळून लावला होता. त्याआधी सयाजी शिंदे आणि काही पर्यावरण संस्थांनी एकत्र येऊन आरे कॉलनीत वाढणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी २५ हजार झाडे नव्याने लावण्याची तयारी दाखवली होती. आरे कॉलनीत हजारो नागरिक मॉर्निंग वॉकसाठी येतात. या सर्वांनी एकत्र येऊन या भागात हा झाडे लावण्याचा संकल्प केला होता. आरेतील मेट्रोच्या कारशेडला नुसता विरोध करत बसण्यापेक्षा आरेत होणाºया प्रदूषणाला आळा घालण्यासाठी ही संकल्पना सुरू केली होती. मात्र प्रदूषण रोखण्यासाठी उदासीन असणाºया वनविभागाने माती देण्यास नकार दिला.आरे कॉलनीत यापूर्वी गर्दुल्ल्यांची संख्या वाढत चालली होती. दारूच्या बाटल्यांचा खच वाढत होता. तेव्हा नागरिकांनी एकत्र येऊन येथे सुंदर नर्सरी उभारली. त्याचाच पुढचा भाग म्हणून ही झाडे लावण्याच्या सयाजी शिंदे यांच्या प्रयत्नांना मात्र माती न देता मातीमोल करण्याचा वनविभागाचा डाव असल्याचा पर्यावरणवाद्यांचा आरोप आहे. शिंदे यांना यापूर्वी साताºयातही अशा अनुभवांना सामोरे जावे लागले होते. साताºयात त्यांनी २५ हजार झाडे लावली होती. मात्र अज्ञात व्यक्तींनी त्यातील १०० झाडे तोडली होती. वनविभाग अशा प्रामाणिक प्रयत्नांना पाठिंबा द्यायचा सोडून टाळाटाळ का करीत आहे, याबद्दल पर्यावरणप्रेमींनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
सयाजी शिंदेंच्या मागणीवर कु-हाड; वन विभागाकडून नकार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2018 12:28 AM