यवतमाळ : कर्जाची पूर्ण परतफेड करूनही कागदपत्रे देण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी भारतीय स्टेट बँकेला ग्राहक न्यायालयाने २८ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. यवतमाळच्या दहिवलकर ले-आउटमधील रमेश नारायण नाखले यांनी दाखल केलेल्या प्रकरणात हा आदेश देण्यात आला.सेवानिवृत्त कर्मचारी रमेश नाखले यांनी १९९९ मध्ये स्टेट बँकेच्या धामणगाव रोड यवतमाळ शाखेतून एक लाख ५० हजार रुपये गृहकर्ज घेतले. त्या वेळी त्यांनी घराचे मूळ खरेदीखत, सातबारा उतारा, फेरफार आदी दस्तावेज बँकेकडे गहाण ठेवले. कर्जाची पूर्ण परतफेड झाल्यानंतर, त्यांनी बँकेला या कागदपत्रांची मागणी केली. मात्र, विविध कारणे देत बँकेने यासाठी टाळाटाळ सुरू केली.दरम्यान, पैशाची गरज भासल्याने नाखले यांनी त्यांच्या २४०० चौरस फुटातील ३०० चौरस फूट प्लॉट विक्रीचा सौदा केला. त्या वेळी एक लाख रुपये इसार घेण्यात आला. प्लॉटची खरेदी न झाल्यास ५० हजार रुपये द्यावे लागतील, असे सौदेपत्रात नमूद केले. खरेदीची तारीख येऊनही बँकेने गहाणातील कागदपत्र दिले नाहीत. परिणामी, सौदा रद्द झाला. बँकेने सदोष सेवा दिल्याने नुकसानभरपाई मिळावी, यासाठी नाखले यांनी जिल्हा ग्राहक न्यायालयात धाव घेतली. मंचाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतला. तक्रारकर्ता कर्जाची परतफेड नियमित करीत नव्हता. त्यामुळे अधिकाऱ्यांना वारंवार त्याच्या घरी जावे लागत होते, असा लंगडा बचाव करण्याचा प्रयत्न या वेळी बँकेने केला. (वार्ताहर)यवतमाळचे रमेश नाखले यांना न्यायबँकेने नाखले यांना नुकसानभरपाईपोटी दहा हजार रुपये, शारीरिक व मानसिक त्रासापोटी पाच हजार, तर तक्रार खर्चाचे तीन हजार रुपये द्यावे. ग्राहक सहायता निधी दहा हजार रुपये जमा करावे, असा आदेश या प्रकरणात ग्राहक मंचाने दिला. मंचाचे अध्यक्ष अॅड. आश्लेषा दिघाडे आणि सदस्य डॉ. अशोक सोमवंशी यांनी हा निर्णय दिला. यवतमाळच्या रमेश नाखले यांनी दाखल केलेल्या प्रकरणात हा आदेश देण्यात आला.
स्टेट बँकेला २८ हजारांचा दंड
By admin | Published: February 22, 2017 4:24 AM