डी-ग्रुपच्या नोकर भरतीच्या नावाखाली बेरोजगारांची फसवणूक
संजय खांडेकर - अकोलाभारतीय स्टेट बँक आॅफ इंडियाच्या रिक्रुटमेंट संकेतस्थळाचा दुरुपयोग करून अमरावती विभागात बेरोजगारांची फसवणूक करणारी टोळी सक्रिय असल्याची खळबजनक बाब उजेडात आली आहे. परंतु याबाबत तक्रार करण्यास कुणीही पुढे येत नाही. दरम्यान, याबाबत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.भारतीय स्टेट बँक आॅफ इंडियाने २८ एप्रिल २०१३ मध्ये विविध पदांसाठी नोकर भरतीसाठी अर्ज मागविले होते. या परीक्षेचा निकालही लागला होता. बँकेच्या संकेतस्थळावरील या निकालाच्या ‘डेटा’ ची नकल काही महाठगांनी केली. यानंतर बेरोजगार तरुणांचा शोध घेतला आणि त्यांना बँकेत नोकरी देण्याचे आमिष दाखविले. सरळ नोकरी मिळत असल्याने अनेक तरुण या महाठगांच्या जाळ््यात अडकले. त्यांनी पैसेही दिले. पैसे मिळाल्यानंतर या टोळीने पैसे घेतलेल्या तरुणांना बँकेच्या संकेतस्थळावरील ‘व्ह्यूव रिझल्ट’ दाखवले. रजिस्ट्रेशन क्रमांक, आसन क्रमांक, नाव, वडिलांचे नाव,जन्म तारीख, पोस्ट अॅप्लाइड आणि पोजिझन आदी सर्व माहिती तरुणांना दाखवून त्याचे प्रिंटआउटही दिले गेले. कोणतीही परीक्षा न देता, थेट निवड झाल्याचे पाहून युवकाना आनंद झाला होता. यापैकी दोन युवकांनी त्यांच्या निवडीची शहनिशा करण्यासाठी अकोल्यातील टॉवर चौकातील स्टेट बँक आॅफ इंडियाचे थेट कार्यालय गाठले. बँक अधिकाऱ्यांना त्यांच्या निवड झाल्याचे सांगितले व सोबत असलेला कागदही दाखविला. यावेळी स्टेट बँकेने २०१३ नंतर नोकर भरती केली. आधीपासून स्टेट बँकेत रोजंदारीवर असलेल्या कर्मचाऱ्यांनाच डी-ग्रुपच्या नोकरभरतीत सामाविण्यात आल्याचे सांगितले. ही माहीती मिळताच बँकेत नोकरी मिळाल्याचा आनंद असलेल्या या तरुणांच्या पायाखालची वाळू सरकली. आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. दरम्यान, या युवकांना बँक अधिकाऱ्यांनी तक्रार करण्याचे सांगितले; मात्र फसवणूक झालेल्या या प्रक्रियेत तेवढेच दोषी असलेल्या या युवकांनी पोलीस किं वा बँकेकडे लेखी स्वरूपात तक्रार केली नाही. या बेरोजगारांनी तक्रार केली नसली तरी बँकेची बनावट संकेतस्थळ तयार करणाऱ्या या ठगांच्या शोधाची अपेक्षा केली जात आहे.एसबीआयच्या संकेतस्थळाचा दुरुपयोग करून कुणी फसवत असेल तर त्यांनी पोलिसांकडे किंवा मुंबईच्या भारतीय स्टेट बँकेकडे लेखी स्वरूपात तक्रार करावी. अद्यापपर्यंत यासंदर्भात कुठलीही तक्रार आमच्यापर्यंत पोहचली नाही. -प्रदीप उपासने, मुख्य व्यवस्थापक, भारतीय स्टेट बँक अकोला.