नवी दिल्ली: मुंबईचे माजी पाेलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविराेधात महाराष्ट्र पाेलिसांनी भ्रष्टाचारप्रकरणी सुरू केलेला तपास ९ मार्चपर्यंत थांबविण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने राज्याला दिले आहेत, तसेच सिंग यांच्याशी संबंधित सर्व प्रकरणांचा तपास सीबीआयकडे द्यावा की नाही, याचाही लवकरच निर्णय घेऊ, असे न्यायालयाने सांगितले. त्यामुळे परमबीरसिंग यांना कारवाईपासून दिलासा मिळाला आहे.
यासंदर्भात न्या. एस. के. काैल आणि न्या. एस. एम. सुंदरेश यांच्या खंडपीठासमाेर सुनावणी झाली. कोर्टाने म्हटले, की माजी गृहमंत्री अनिल देशमुख व सिंह यांच्याशी संबंधित भ्रष्टाचाराचे प्रकरण हा सगळा गाेंधळाचा प्रकार आहे. लाेकांच्या पाेलिसांवरील विश्वासाला तडा जाऊ शकताे. हे प्रकरण आम्ही अंतिम सुनावणीसाठी घेणार आहोत.
राज्य सरकारची बाजू मांडताना ज्येष्ठ विधिज्ञ दारियस खंबाटा यांनी न्यायालयाला तपास थांबविण्याचे निर्देश रेकाॅर्डमध्ये न नाेंदविण्याची विनंती केली. त्यावर न्यायालयाने तपास थांबविण्याचे आश्वासन मागितले. तर सीबीआयची बाजू मांडताना साॅलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितले, की सिंह यांच्याशी संबंधित सर्व प्रकरणांचा तपास सीबीआयने करायला हवा.