सूर्यकांत वाघमारे,
नवी मुंबई- माथाडी कामगारांसाठी राखीव असलेली घरे बिगर माथाडींना मिळवून देण्याचे आमिष दाखवून १०४ जणांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तब्बल ४ कोटी ५१ लाख रुपयांची त्यांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी नेत्यांच्या कोट्यातून घरे मिळवून देण्याचे सांगून फसविणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल झाला असून यामधील एक जण माथाडी पतसंस्थेचा कर्मचारी आहे. गुन्हा दाखल झालेल्या आरोपींमध्ये महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनच्या पतसंस्थेचा कर्मचारी दिलीप ऊर्फ भाऊसाहेब यादव व संतोष चव्हाण यांची नावे आहेत. शासनाने नवी मुंबईत स्थलांतरित झालेल्या माथाडी कामगारांना १९९३ साली ५ हजार, १९९९ साली ४९० तर गतवर्षी ४९० घरांचे वाटप झालेले आहे. यापूर्वीही माथाडी कामगारांसाठी राखीव असलेली घरे इतर संस्थांना देण्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्याचीच पुनरावृत्ती पुन्हा झाली असून कामगारांची घरे इतरांना मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्यांचे रॅकेट उघडकीस आले आहे. या प्रकरणी आनंदराव धनावडे, प्रदीप वाडकर, रामचंद्र शेडगे, राजाराम धनावडे यांच्यासह १०४ जणांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. आरोपी संतोष यादव याने विश्वास संपादित करून २०१४ साली अनेकांना नेत्यांच्या कोट्यातून माथाडी कामगारांसाठी राखीव असलेली घरे मिळवून देण्याचे आमिष दाखवले होते. शिवाय सन १९९२ व ९३ साली देखील माथाडी कामगार नसलेल्यांनाही माथाडी कोट्यातून घरे मिळालेली असल्याचेही सांगितले. यानंतर प्रत्येकी ५० हजार रुपये घेवून त्यांचा धातू व कागद बाजार आणि दुकाने माथाडी कामगार मंडळाचा नोंदणी अर्ज भरून घेतला. तसेच प्रत्येकाकडून घरासाठी टोकन स्वरूपात सुमारे साडेचार कोटी रुपये घेतल्यानंतर त्यांच्या नावांचा उल्लेख असलेले युनियनचे पत्र दाखवून हेच शिफारसपत्र सिडकोकडे गेलेले असल्याचे सांगितले होते. दरम्यानच्या काळात यादवचा संपर्क तुटला असता, पोपटराव देशमुख यांनी सर्वांबरोबर युनियन कार्यालयात बैठक घेतली. त्याठिकाणी माथाडी नेते आमदार नरेंद्र पाटील, माजी मंत्री शशिकांत शिंदे यांच्यासह यादवचे आई-वडील उपस्थित होते. यावेळी यादवच्या आई-वडिलांनी दिलगिरी व्यक्त केली. शिवाय त्याठिकाणीच उपस्थित असलेल्या संतोष चव्हाण याने सर्वांचे पैसे परत करण्याची हमी दिली. कालांतराने संपूर्ण प्रकारावर संशय आल्यामुळे काहींनी युनियनच्या पत्राबाबत चौकशी केली असता, सिडकोला युनियनमार्फत तसे पत्रच गेलेले नसल्याचे उघड झाले. यानुसार त्या सर्वांनी फसवणुकीची तक्रार केल्यानंतर दोघांविरोधात गुन्हा दाखल केल्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र गलांडे यांनी सांगितले.>दोन वर्षांपूर्वी दिला होता सावधानतेचा इशारामाथाडी कामगारांना मंजूर झालेली घरे दोन वर्षांपूर्वीच संपुष्टात आलेली आहेत. त्यानंतरही माथाडीच्या घरांच्या नावे पैसे उकळले जात असल्याची तक्रार युनियनकडे करण्यात आली होती. याद्वारे दोन वर्षांपूर्वीच युनियनच्या प्रत्येक कार्यालयाबाहेर नोटीस लावून दलालांपासून सावधानतेचा इशारा दिलेला आहे. त्यामुळे घडलेल्या प्रकाराचा युनियनशी कसलाही संबंध नाही. शिवाय ज्यांची फसवणूक झालेली आहे, त्यांना संबंधितांकडून पैसे परत मिळवून देण्याच्या सूचना पोलिसांना केल्या आहेत.- नरेंद्र पाटील, सरचिटणीस, माथाडी कामगार युनियन