मुंबई - पीकविमा योजनेत गैरप्रकार झाल्याचं खुद्द कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं होते. हा गैरप्रकार वेळीच उघडकीस आल्यानं शासनाचे पैसे वाचले असंही कोकाटेंनी सांगितले. त्यावर भाजपा आमदार सुरेश धस यांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना चॅलेंज देत हा घोटाळा ५ हजार कोटींहून अधिक असल्याचा दावा केला आहे.
भाजपा आमदार सुरेश धस म्हणाले की, पीकविमा कोटीचा भ्रष्टाचार ५ हजार कोटींच्यावर आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परदेश दौऱ्यावरून आल्यानंतर मी त्यांना पत्र लिहिणार आहे. या घोटाळ्याची सखोल चौकशी नेमावी आणि सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून संपूर्ण चौकशी करावी. सीएसीसी केंद्र हे प्यादे आहेत. एकाच तालुक्यातील सीएससी केंद्र सगळीकडे कसे जातात? ठराविक शेतकरी ८ जिल्ह्यात पीकविमा भरतो. माझं कृषीमंत्र्यांना चॅलेंज आहे. तुम्ही माझ्यासमोर चर्चेला या, माझी तयारी आहे असं त्यांनी सांगितले.
त्याशिवाय शासनाचे पैसे वाचले नाहीत. सरकारने साडे तीनशे कोटी दाखवले मात्र हा भ्रष्टाचार ५ हजार कोटीच्या वर जाणार आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी सभागृहात जाहीर केले होते आम्ही या प्रकरणावर सखोल चौकशी करू. परभणी जिल्ह्यात ४० हजार हेक्टर, बीड जिल्ह्यात ३९ हजार हेक्टरचा बोगस पीकविमा काढण्यात आला. ३५० कोटींचा घोटाळा झाला असं कृषीमंत्री म्हणतात परंतु तुम्ही आता चार्ज घेतला आहे. सर्व कागदपत्रे हवी असतील तर मी तुम्हाला देतो, ५ हजार कोटींवर हा घोटाळा गेला आहे असं धस यांनी म्हटलं.
दरम्यान, काही कंपन्या शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक अडचणीत आणत असताना मीच कृषी आयुक्तांना पत्र लिहिलं होते. जसं काही राज्यात पीकविमा कंपन्यांना बाहेर गेलेत तसं पीकविम्याऐवजी वेगळा पर्याय शेतकऱ्यांना देता येऊ शकतो का यावर अभ्यास करून अहवाल द्यावा असं सांगितले होते, एवढे मला माहिती आहे बाकी माहिती नाही असं उत्तर माजी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहे.
महादेव मुंडे हत्येतील आरोपी मोकाट
२२ ऑक्टोबर २०२३ ला महादेव दत्तात्रय मुंडे याचा खून झाला त्यातील एकही आरोपी पकडला गेला नाही. आरोपी हे आका वाल्मिक कराडचा मुलगा सुशीलसोबत फिरताना दिसतात. महादेव मुंडे खून प्रकरणाचं पत्र मी लिहिलं आहे. राजाभाऊ फडला मुख्य आरोपी करा असं वाल्मिक कराडने पोलिसांना सांगितले होते. परळीसोडून पहिली हत्या संतोष देशमुखची झाली. बाकी सगळ्या हत्या परळीत झालेल्या आहेत. अजित पवार पालकमंत्री आहेत त्यामुळे या गोष्टींना १०० टक्के आळा बसेल असं आम्हाला गॅरंटी आहे असंही सुरेश धस यांनी सांगितले.