डोंबिवली: वीजबिल भरल्याची बनावट पावती देऊन रक्कम परस्पर हडपून ग्राहक व महावितरणची फसवणूक करणाऱ्या एका भामट्याला उल्हासनगर पोलिसांनी गजाआड केले. दीपक महादेवप्रसाद श्रीवास्तव (उल्हासनगर कॅम्प-३) असे त्या भामट्याने नाव असून आतापर्यंत त्याने ७ ग्राहकांची दीड लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. दरम्यान, यानंतर आरोपीची रवानगी कोठडीत करण्यात आली आहे.
तेथील साईबाबा मंदिर परिसरात वसुली मोहिमेवर असलेले वित्त व लेखा विभागाचे उपव्यवस्थापक किशोरकुमार जयकर व त्यांच्या पथकाला एका थकबाकीदार ग्राहकाने वीजबिल भरल्याची पावती दिली. संबंधित पावती बनावट असल्याची कल्पना देऊन पथकाने संबंधित ग्राहकाचा वीजपुरवठा खंडित केला. त्यानंतर आणखी सहा अशा एकूण सात तक्रारी महावितरणकडे आल्या. या ग्राहकांचा विश्वास संपादन करून त्यांच्या वीजबिलाचा भरणा करण्यासाठी दीपक श्रीवास्तव याने दीड लाख रुपये घेतले. मात्र ही रक्कम महावितरणकडे जमा न करता परस्पर हडप केली व बनावट पावत्या देऊन ग्राहकांचीही फसवणूक केली.
जयकर यांच्या फिर्यादीवरून उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात श्रीवास्तव विरुद्ध गुन्ह्याची नोंद झाली असून आरोपीला अटक करण्यात आल्याचे महावितरणने सोमवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले. पोलीस तपासातून फसवणूक झालेले आणखी काही ग्राहक निष्पन्न होण्याची शक्यता आहे. 'कोणत्याही परिस्थितीत वीजबिलाचा भरणा डिजिटल माध्यमातून किंवा महावितरणच्या अधिकृत वीज बिल भरणा केंद्रातच करावा व छापील भरणा पावती घ्यावी. वीजबिल भरणा करण्याबाबत महावितरणबाह्य कोणत्याही व्यक्ती अथवा घटकांवर विश्वास ठेऊ नये,' असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.