ठाणे : ठाणे पोलिसांनी उघडकीस आणलेल्या सैन्य भरती घोटाळ्यामध्ये भारतीय सेना दलातील ४ आजी-माजी कर्मचाऱ्यांचा सहभाग स्पष्ट झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी एकूण २१ आरोपींना अटक केली असून, सर्व आरोपींना न्यायालयाने सोमवारी ४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.सैन्य भरती मंडळातर्फे (आर्मी रिक्रुटमेंट बोर्ड) २६ फेब्रुवारी रोजी लिपिक आणि ट्रेड्समनसह ४ पदांसाठी देशभरात लेखी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेची प्रश्नपत्रिका फोडणाऱ्या टोळीचा ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने रविवारी पर्दाफाश केला. पोलिसांनी एकाच वेळी पुणे, नागपूर आणि गोव्यात धाड टाकून २१ आरोपींना अटक केली. नागपूर येथील सैन्य भरती कार्यालयात लिपिक म्हणून कार्यरत रविकुमारने सेना दलात कार्यरत असलेला त्याचा नागपूर येथील साथीदार धाकलू पाटील याच्या मदतीने प्रश्नपत्रिका फोडल्याचा आरोप आहे. धाकलू पाटील याने प्रश्नपत्रिका संतोष शिंदे याला पाठवली. शिंदे याने माजी सैनिक सुभाष निर्मळे (रा. अकोला) याच्यासह संदीप फडतरे (रा. सोलापूर), प्रसाद धनोटे (रा. अहमदनगर), वैभव शेषवरे (रा. सांगली), नागपूर येथील टँगो चार्ली अॅकॅडमीचा संस्थाचालक जयकुमार बेलखेडे (रा. वर्धा), संदीप भुजबळ (रा. नाशिक), नाशिक येथील नाशिककर करिअर अॅकॅडमीचे संस्थाचालकद्वय संदीप नागरे आणि किरण गामणे यांना प्रश्नपत्रिका पाठवली. त्यांच्याकडून प्रश्नपत्रिका नागपूर येथील परीक्षार्थ्यांना पुरविण्यात आल्याचा आरोप आहे. पोलिसांनी रविकुमार आणि धाकलू पाटील वगळता उर्वरित ९ आरोपींना नागपुरातून अटक केली. आरोपी सुभाष निर्मळे याची नागपूर येथे कॅप्टन सुभाष निर्मळे करीअर अॅकॅडमी आहे.पुण्यातील धाडीबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पांडेनामक आरोपीने तेथील राजे छत्रपती अॅकॅडमीचा संचालक धनाजी जाधव उर्फ अप्पा (रा. सातारा) आणि संदीप कांतिलाल शितोळे (रा. पुणे) यांना त्याच्या मोबाइल फोनद्वारे प्रश्नपत्रिका पाठवली होती. या दोघांनी पुण्यातील खडकी येथे डेपो बटालियनपदावर कार्यरत असलेल्या महेंद्र चंद्रभान सोनावणे (रा. अहमदनगर) याच्यासह अक्षय साबळे (रा. बारामती, पुणे), सोमनाथ सव्वाशे (रा. सोलापूर), तुषार इंगळे (रा. सातारा), गणेश गायकवाड (रा. सांगली), संतोष बर्गे (रा. पुणे) आणि माजी सैनिक रामप्पा पटोळी (रा. पुणे) यांच्या मदतीने प्रश्नपत्रिका परीक्षार्थ्यांना पुरवली. पुण्यातून पांडे वगळता उर्वरित ९ आरोपींना अटक करण्यात आली आहे. राजे छत्रपती अॅकॅडमीचा संचालक धनाजी जाधव याने सीमा सुरक्षा दलाचा जवान रणजित जाधव (रा. सातारा) याला ही प्रश्नपत्रिका पाठवली होती. जाधवने त्यांच्या टोळीतील गोव्याचे काम पाहणारे गणेश नरसाळे (रा. सोलापूर) आणि वैभव वडर (रा. सांगली) यांना व्हॉट्सअॅपद्वारे प्रश्नपत्रिका पाठवून त्यांच्या मदतीने ती परीक्षार्थ्यांना पुरवल्याचा आरोप आहे. गोव्यातून या तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी पुणे आणि नागपुरातून प्रत्येकी ९ तर गोव्यातून ३ अशा एकूण २१ आरोपींना अटक केली आहे. (प्रतिनिधी)>आरोपींची संख्या वाढणारसैन्य भरती मंडळाचा कारभार दिल्ली येथून चालतो. प्रश्नपत्रिका परीक्षार्थींपर्यंत ज्यांच्यामार्फत पोहोचली, ते पोलिसांच्या जाळ्यात अडकले असले, तरी त्यांच्यापर्यंत प्रश्नपत्रिका कुठून आली, याचा तपास पोलीस करीत आहेत. या प्रकरणाचे धागेदारे थेट दिल्लीपर्यंत पोहोचू शकतात, असा अंदाज तपास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. सैन्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सहभागाची शक्यताही तपास अधिकाऱ्यांनी नाकारली नाही. त्यामुळे नजीकच्या काळात या प्रकरणातील आरोपींची संख्या वाढू शकते.
घोटाळ्याचे सेना दल कनेक्शन
By admin | Published: February 28, 2017 4:52 AM