सुरेश लोखंडे । लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत, व्यापारी , सहकारी आणि नागरी आदी सुमारे एक हजार १२ बँकांमधील लाखो खातेदारांना रकमांचा पुरवठा अत्यल्प प्रमाणात होत आहे. याशिवाय जिल्ह्यातील १,१५० एटीएममध्ये ही पैशांचा तुटवडा आहे. उपलब्ध रकमेतून खातेदाराना गरजेपेक्षा कमी रक्कम दिली जात आहे. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी अधिक रकमेचा पुरवठा वेळीच करण्यासाठी सहकारमधील अग्रगण्य बँक असलेल्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (टीडीसीसी) रिझर्व बँकेकडे तक्रार केली आहे. टीडीसीसीच्या १०१ शाखा आहेत. त्यांची रोज ५ ते ५० कोटींची उलाढाल आहे. पण केवळ दीड ते दोन कोटी रूपये दैनंदिन व्यवहारासाठी मिळत आहेत. तसेच जिल्ह्यातील एक हजार १२ बँकांच्या खातेदारांकडून रोज १६० कोटी रूपयांची उलाढाल होते. आठवड्याभरात एक हजार कोटींची उलाढाल होणाऱ्या या बँकाची आर्थिक गरजपूर्ण करण्यासाठी दोन ते तीन दिवसांचा विलंब लागत आहे. मार्च, एप्रिल महिन्यातील मंदी काही अंशी कमी झाल्यामुळे खातेदारांना मोठ्या रकमेची गरज भासत आहे. १६० कोटींच्या दैनंदिन उलाढालीपेक्षा सुमारे २०० ते २५० कोटींच्या रकमेची गरज ठाणे जिल्ह्याला भासत आहे. जिल्ह्यात असलेले ११५० एटीएममध्ये १०० कोटी रूपयांचा भरणा करूनही ग्राहकाना पुरेशी रक्कम मिळत नाही. ठाणे, मुंबईतील रक्कम राज्याच्या अन्य जिल्ह्यात जात आहे. यामुळे जिल्ह्यात आर्थिक टंचाई असल्याचा दुजोरा लिड बँकेच्या व्यवस्थापक राजन जोशी यांनी देखील दिला.
ठाणे जिल्ह्यातील १०१२ बँकाना कॅशचा तुटवडा
By admin | Published: May 10, 2017 3:12 AM