- सायली जोशी- पटवर्धन, पुणेकामकाजात मराठीचा आग्रह धरला जात असताना त्यासाठी आस्थापन उपलब्ध करून देण्याबाबत मात्र राज्य शासन उदासीनता असल्याचे दिसत आहे. गेल्या १० वर्षांपासून शासनाच्या भाषा संचालनालयातील मराठीत अनुवादकांची २० हून अधिक पदे रिक्त असल्याच्या वृत्ताला संचालिका मंजुषा कुलकर्णी यांनी दुजोरा दिला आहे.तसेच शासनालाच नव्हे, तर खासगी संस्थांनाही उत्तम मराठीत अनुवाद करू शकणाऱ्या व्यक्ती सापडणे दुरापास्त झाले आहे. मराठी अनुवाद क्षेत्रातही उत्तम करिअर होऊ शकते, याबाबत विद्यार्थ्यांना वेळोवेळी माहिती आणि प्रशिक्षण देण्याची आवश्यकता असल्याचे एका खासगी भाषांतर संस्थेच्या संचालिका देवकी कुंटे म्हणाल्या. मराठी अनुवादकांसाठी गेल्या २ वर्षांपासून विद्यापीठ आणि पुण्यातील विविध महाविद्यालयांमध्ये संपर्क केला असताही अनुवादाच्या कामासाठी पात्र व्यक्ती मिळत नसल्याचेही त्यांनी सांगितले.सध्या विद्यार्थ्यांचा परदेशी भाषा शिकण्याकडे कल आहे. मात्र मातृभाषेकडे तरुणांचे दुर्लक्ष होत आहे. आपली भाषा समृद्ध असून त्यातही उत्तम करियर करता येऊ शकते, मात्र याबाबत विद्यार्थ्यांना पुरेशी माहिती आणि प्रशिक्षण मिळत नाही, या वस्तुस्थितीकडे कुंटे यांनी लक्ष वेधले.भाषा संचालनालयातील अनुवादकांच्या २० हून अधिक जागा रिक्त आहेत. या जागा लोकसेवा आयोगाकडून विशिष्ट प्रक्रियेतून भरण्यात येतात. त्याची प्रक्रिया सध्या सुरू असून येत्या काही दिवसातच त्या भरल्या जातील.- मंजुषा कुलकर्णी, भाषा संचालक, भाषा संचालनालयअनुवादकांची संख्या वाढावी यासाठी राज्य मराठी विकास संस्थेतर्फे प्रशिक्षण वर्गांचे आयोजन करण्यात येणार आहे. अनुवादकांची विशेष यंत्रणा उभी राहावी, यासाठी संस्था विशेष प्रयत्न करेल.- डॉ. आनंद काटीकर, प्रभारी संचालक, राज्य मराठी विकास संस्था
शासनाकडे मराठी अनुवादकांचा तुटवडा
By admin | Published: March 28, 2016 12:39 AM