शिवसेनेच्या शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेवर येत्या पाच दिवसांत निकाल येणार आहे. यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढील ८ महिने मीच मुख्यमंत्री राहणार असल्याचे म्हटले आहे. एकीकडे विधानसभा अध्यक्षांवर राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा निर्णय घेण्याची जबाबदारी असताना दुसरीकडे राष्ट्रवादीतील अजित पवार गटाच्या अपात्रतेवरही सुनावणी घ्यावी लागणार आहे. याचे वेळापत्रक ठरविण्यात आले आहे.
राष्ट्रवादीच्या अजित पवार विरुद्ध शरद पवार यांच्यातील अपात्रतेच्या याचिकेवर येत्या १६ जानेवारीपासून सुनावणी सुरु होणार आहे. २०, २१ जानेवारीला अजित पवार गटाच्या आमदारांची उलट तपासणी घेतली जाणार आहे. तर २२, २३ जानेवारीला शरद पवार गटाच्या आमदारांची उलट तपासणी घेतली जाणार आहे. विधानसभा अध्यक्षांना राष्ट्रवादीतील या अपात्रतेच्या याचिकेवर जानेवारी संपताच निर्णय द्यावा लागणार आहे.
दोन्ही गटांच्या अपात्रतेच्या वादावर २५ ते २७ असा युक्तीवाद ठेवला जाणार आहे. यानंतर विधानसभा अध्यक्ष शिवसेनेच्या याचिकेवर निर्णय देण्यासाठी मागितलेला वाढीव वेळ राष्ट्रवादीच्या निकालासाठी देखील मागण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या याचिकेवरील निकाल शिंदेंच्या बाजुने आला तर राज्य़ात जैसे थेच परिस्थिती राहणार आहे. तसेच ठाकरे गट या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्य़ाची शक्यता आहे. परंतु, जर शिंदेंविरोधात निकाल आला तर मात्र राज्यात सरकारची परिस्थिती अवघड होण्याची शक्यता आहे.
शिंदेंच्या १६ आमदारांविरोधात अपात्रतेची याचिका आहे. तर अजित पवारांसह ९ मंत्र्यांविरोधात शरद पवार गटाने अपात्रतेची याचिका दाखल केली आहे. आता या दोन्ही याचिकांवर काय निकाल लागतो याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.