नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे १२५वे जयंती वर्ष राज्य सरकारतर्फे साजरे केले जात आहे. राज्यातील अनुसूचित जातीच्या अडीच लाख कुटुंबांकडे स्वत:चे घर नाही. २०१९पर्यंत या प्रत्येक कुटुंबाला हक्काचे घर दिले जाईल. त्यासाठी राज्य सरकारने निधीचे नियोजन केले असून, ग्रामविकास खात्यांतर्गत यंत्रणा उभी केली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.नागपूर जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पूर्णाकृती पुतळ्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. या वेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा. कृपाल तुमाने व अन्य मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्र्यांशी आपण नुकतीच चर्चा केली असून, दीक्षाभूमीच्या विकासाचा १५० कोटी रुपयांचा आराखडा केंद्र सरकारला पाठविण्यात येईल. या आराखड्याला मंजुरी देण्याचे आश्वासनही केंद्रीय मंत्र्यांनी दिले आहे. गेली अनेक वर्षे रखडलेला इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली. पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन झाले.मध्य प्रदेशने कृषी क्षेत्रात क्रांती केली आहे. मध्य प्रदेशचा पॅटर्न पाहिला असता त्यांनी मोठ्या प्रमाणात शेततळ्यांची निर्मिती केल्याचे दिसून आले. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही ५ लाख शेततळी देण्याचा निर्णय घेण्यात आला.
अनुसूचित जातींच्या कुटुंबाना घर
By admin | Published: February 08, 2016 4:36 AM