नाशिक : शिष्यवृत्ती परीक्षेसाठी मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजीमधून प्रश्नपत्रिका देण्यात आल्याचा प्रकार रविवारी (दि.२६) उघडकीस आला. सेमी मराठीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी प्रश्नपत्रिका मिळाल्याने मुलांना प्रश्नपत्रिका अधिक दर्जेदारपणे सोडवता आली नाही. यामुळे पालकांनी पेठे विद्यालय या परीक्षा केंद्रावरील केंद्र संचालकांना धारेवर धरले.महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणेच्या वतीने जिल्हा परिषदेमार्फत रविवारी शहरात प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली; मात्र या परीक्षेदरम्यान दोन केंद्रांवर गोंधळ झाला. मराठा विद्या प्रसारक समाजाच्या गोरेराम लेनमधील अभिनव बालविकास मंदिर या शाळेतील प्राथमिक वर्गातील सुमारे शंभर विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेला बसले होते. या विद्यार्थ्यांच्या परीक्षा प्रवेशपत्रावर ‘सेमी इंग्रजी’ असा उल्लेख आला; मात्र सदर बाब संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या निदर्शनास आणून दिला नाही. यामुळे या केंद्रावर काही विद्यार्थ्यांना इंग्रजी प्रश्नपत्रिका मिळाल्या. विद्यार्थ्यांनी मराठी माध्यमातून परीक्षेची तयारी केली. मात्र त्यांना इंग्रजीमधून प्रश्नपत्रिका देण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांना भाषा विषयाचा पेपर सोडविता आला नसल्याने अनेकांना रडू कोसळले. साडेबारा वाजेच्या सुमारास भाषेचा पेपर संपला व मुले कें द्रातून बाहेर आली तेव्हा सदर प्रकार उघडकीस आला. पालकांनी केंद्र संचालकांना जाब विचारला. दरम्यान, केंद्र संचालकांनी सदर प्रकार शिक्षण अधिकारी प्रवीण आहेर यांना कळविला. आहेर पेठे विद्यालयात दुपारी पोहचले असता पालकांसह विद्यार्थ्यांनी त्यांना घेराव घालत घडलेला प्रकार कथन केला.