ब्रम्हानंद जाधव, ऑनलाइन लोकमत
बुलडाणा : पूर्व माध्यमिक व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा मार्च २०१६-१७ मध्ये इयत्ता चौथी व सातवी ऐवजी इयत्ता पाचवी व आठवीमध्ये घेण्यात येणार आहे. या शिष्यवृत्ती परीक्षेचे स्वरूप बदलण्यात आले असून, परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्रे व सामान्य विज्ञान या विषयांना वगळून गणित व बुद्धीमत्ता विषयांवर भर देण्यात आलेला आहे.
नविन स्वरूपातील या शिष्यवृत्ती परीक्षेत गणित व बद्धीमत्ता या विषयांचा वरचष्मा राहणार आहे. इयत्ता चौथी व सातवीसाठी आतापर्यंत पूर्व माध्यमिक व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येत होती. दरवर्षी घेतल्या जाणा-या शिष्यवृत्तीच्या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण होते. त्यामुळे इयत्ता चौथी व सातवीतील जवळपास प्रत्येक विद्यार्थी या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये सहभाग घेतात. परंतू, सन २०१६-१७ पासून पूर्व माध्यमिक व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षेचे स्वरूप बदलण्यात आले आहे. पूर्वी इयत्ता चौथी व सातवीसाठी शिष्यवृत्ती परीक्षेचे ३०० गुणांसाठी तीन पेपर घेण्यात येत होते. यात सन २०१६-१७ या वर्षापासून शिष्यवृत्ती परीक्षेचे स्वरूप बदलून इयत्ता चौथीच्या ऐवजी पाचवी व सातवीच्या ऐवजी आठवीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा ठेवण्यात आली आहे. तसेच तीन पेपर ऐवजी दोनच पेपर ठेवण्यात आले आहेत. या नव्या स्वरूपाच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्रे व सामान्य विज्ञान या विषयांना वगळून गणित व बुद्धिमत्ता चाचणी या विषयांसाठी गुण वाढविण्यात आले आहेत. आतापर्यंत झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये गणित व बुद्धिमत्ता चाचणी या विषयांसाठी प्रत्येकी ७० गुण ठेवण्यात आले होते. परंतू आता नव्या शिष्यवृत्ती परिक्षेमध्ये गणित व बुद्धीमत्ता चाचणी या विषयांसाठी प्रत्येकी १०० गुण ठेवण्यात आले आहेत.
असे आहे शिष्यवृत्ती परीक्षेचे नविन स्वरूप-
-पेपर एकमध्ये प्रथम भाषा ५० गुण व गणित विषयासाठी १०० गुण.
-पेपर दोनमध्ये तृतीय भाषा ५० गुण व बुद्धिमत्ता चाचणी या विषयासाठी १०० गुण.
-सोप्या स्वरूपाचे प्रश्न ३० टक्के
-मध्यम स्वरूपाचे प्रश्न ४० टक्के
-कठीण स्वरूपाचे प्रश्न ३० टक्के
शिष्यवृत्ती परीक्षेच्या नावात बदल-
आतापर्यंत घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेला पूर्व माध्यमिक व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा असे नाव होते. परंतू, सन २०१६-१७ या शैक्षणिक सत्रापासून शिष्यवृत्ती परीक्षेचे स्वरूप बदलण्यात आले असून,परीक्षेच्या नावातही बदल करण्यात आला आहे. आता उच्च प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती योजना या नावाने सदर परीक्षेस ओळखले जाणार आहे.