मुंबई : अखिल भारतीय सेवांमध्ये राज्यातील यशाचा टक्का वाढविण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेसाठी गुणवत्ताधारित विशेष शिष्यवृत्ती योजना सुरू करण्याचा निर्णय मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यामुळे पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत अशा तीन भागांत दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीसह उमेदवारास १० हजार रुपयांचा दरमहा निर्वाह भत्ता मिळणार आहे.दिल्लीतील नामांकित संस्थांमध्ये आयएएसच्या पूर्वतयारीसाठी शिक्षण मिळावे यासाठी हा भत्ता असेल. त्यासाठी २३.४६ कोटींच्या खर्चासही मान्यता दिली. महाराष्ट्राचा रहिवासी व कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न कमाल १० लाखांपर्यंत असणाऱ्यास याचा लाभ घेता येईल; तसेच तो मागील तीन वर्षांमध्ये किमान एक वेळा यूपीएससीची मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊन मुलाखत फेरीपर्यंत पोहोचून यशस्वी न झालेला असणे आवश्यक असेल. यूपीएससीच्या परीक्षेची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर पुढील वर्षीच्या परीक्षेसाठी या शिष्यवृत्तीचा अर्ज मुंबई येथील राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध होईल. (विशेष प्रतिनिधी)
लोकसेवा परीक्षेसाठी शिष्यवृत्ती
By admin | Published: January 13, 2016 4:17 AM