मुंबई : खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या परदेशी शिक्षणासाठीच्याशिष्यवृत्ती नियमांमध्ये उच्च व तंत्र शिक्षण विभागाने बदल केले आहेत. भारतातील विद्यापीठात पदवी परीक्षा किमान ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असेल अशा विद्यार्थ्यांनाही परदेशात पदव्युत्तर पदविका किंवा पदव्युत्तर पदवी प्राप्त करण्यासाठी आता शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.
भारतातील विद्यापीठातून किमान ५५ टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती दिली जाईल. परदेशी शिष्यवृत्तीचा लाभ एका विद्यार्थ्याला फक्त एकदाच घेता येईल. मात्र, या योजनेंतर्गत पदव्युत्तर पदवीचा अभ्यास सुरू असताना त्या विद्यार्थ्यास पीएच.डीसाठी शासन निर्णयात समाविष्ट विषयांमध्ये दर्जावाढ करण्याची संधी मिळाल्यास सदर विद्यार्थी याच योजनेंतर्गत पुढील अभ्यासक्रमासाठी लाभ घेण्यास पात्र राहील. मात्र, त्यासाठी विद्यार्थ्याने अर्ज करून मान्यता घेणे बंधनकारक असेल. एका कुटुंबातील दोन मुलांना परदेशी शिष्यवृत्तीचा लाभ मिळेल. तसे प्रतिज्ञापत्र पालकांनी देणे अनिवार्य असेल. निर्वाह भत्ता/इतर खर्च/ आकस्मिक खर्चदेखील विद्यार्थ्यांना दिला जाईल. अमेरिका व इतर देशांसाठी (ब्रिटन वगळून) १५०० यूएस डॉलर आणि ब्रिटनसाठी ११०० ब्रिटिश पाऊंड इतकी रक्कम दिली जाईल.