२४ विद्यार्थ्यांची उपस्थिती : शिक्षकांचे प्रयत्न
नंदुरबार : ढगफुटीच्या घटनेने जलमय झालेल्या तालुक्यातील पाचोराबारी या गावातील जिल्हा परिषदेची शाळा अखेर पाच दिवसानंतर गुरुवारपासून सुरू झाली आहे.पाचोराबारी या गावात रविवारी मध्यरात्री अचानक जलप्रलय आल्याने पूर्ण गाव पाण्याखाली आले होते. अनेक घरे वाहून गेल्याने गावात भीतीचे वातावरण होते. गावातील जिल्हा परिषदेची शाळादेखील पाण्याखाली आली होती. पूर ओसरल्यानंतर शिक्षकांनी ग्रामस्थांच्या मदतीने शाळेतील चिखल व पटांगणातील दुर्गंधी दूर केली. तीन दिवसांच्या प्रयत्नानंतर त्यांना यश आले. तथापि, गावात भीतीचे वातावरण कायम असल्याने विद्यार्थी शाळेत येण्यास धजावत होते. त्यामुळे बुधवारी शिक्षकांनी गावात फिरून जे जे विद्यार्थी भेटतील किंवा त्यांच्या पालकांना शाळा सुरू होणार असल्याची सूचना दिली. काही विद्यार्थ्यांना शाळेच्या आवारात बोलवून त्यांना बिस्कीट वाटप केले व गुरुवारपासून शाळा सुरू केली.यासंदर्भात मुख्याध्यापक मेघराज पेंढारकर व शिक्षिका पार्वताबाई वळवी यांनी सांगितले की, गुरुवारपासून शाळा सुरळीत केली. विद्यार्थ्यांमध्ये भीती असली तरी ती दूर करून त्यांना शाळेत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. शाळेच्या पटावर एकूण १११ विद्यार्थी असून त्यापैकी आज २४ विद्यार्थी उपस्थित होते. या विद्यार्थ्यांना पोषण आहारही देण्यात आला. हळूहळू उपस्थिती वाढेल, असे त्यांनी सांगितले.