नवी मुंबई : सायन - पनवेल महामार्ग व डॉ. डी. वाय. पाटील मैदानाकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडच्या मधील भूखंडावर स्कूल बस ठेकेदाराने अनधिकृत वाहनतळ सुरू केला होता. पालिकेने वाहनतळ बंद करून या भूखंडाचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. नेरूळमधील स्कूल बसच्या अनधिकृत पार्किंगचा विषय ऐरणीवर आला आहे. रोडवर व मोकळ्या भूखंडावर जागा मिळेल तिथे बसेस उभ्या केल्या जात आहेत. महामार्ग व स्टेडियमकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडच्या मधील भूखंडावरही रोज ४० ते ५० बसेस उभ्या केल्या जात होत्या. हरित पट्ट्यासाठी राखीव भूखंडावर हा वाहनतळ सुरू होता. वाहनांच्या धुरामुळे व रोडवरील धुळीमुळे परिसरात प्रदूषण होते. प्रदूषण कमी करण्यासाठी रोडच्या बाजूने जास्तीत जास्त वृक्षलागवड करणे आवश्यक आहे. यामुळे पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी हरित पट्टा विकसित करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. सर्व्हिस रोडच्या १५ मीटर जागेत डांबरीकरणाचा भाग वगळून उर्वरित जागेवर वृक्षलागवड केली जाणार आहे. उर्वरित जागेवरही हिरवळ विकसित केली जाणार आहे. यामुळे येथील अनधिकृत वाहनतळही बंद होणार आहे. पालिकेच्या या निर्णयामुळे स्कूल बस ठेकेदाराला मोठा दणका बसणार असून वाहने उभी करण्यासाठी नवीन जागा शोधावी लागणार आहे. (प्रतिनिधी)>शेट्टींना फटका : काँगे्रसचे माजी नगरसेवक संतोष शेट्टी यांच्या स्कूल बस मोठ्याप्रमाणात डॉ. डी. वाय. पाटील मैदान व महामार्गाच्या मधील जागेवर उभ्या केल्या जात होत्या. काँगे्रस नगरसेविका मीरा पाटील यांनी येथे स्कूल बस उभ्या करण्यासाठी जागा उपलब्ध व्हावी अशी मागणीही केली होती. परंतु आता तेथे हिरवळ विकसित होणार असल्याने त्याचा मोठा फटका शेट्टी यांना बसणार आहे.
स्कूल बस ठेकेदारास पालिकेचा दणका
By admin | Published: July 22, 2016 1:47 AM