मुंबई : सरकारने प्रत्येक व्यक्तीला दिवसाला कमाल १० हजार, तर आठवड्याला कमाल २० हजार रुपये बँकेतून काढण्याची मर्यादा घातली आहे. यामुळे आर्थिक कोंडी झालेल्या स्कूलबसचालक व मालवाहतूकदारांनी बुधवारपासून या सेवा बंद होतील, अशी शक्यता व्यक्त केली आहे. यामुळे विद्यार्थी व पालक वेठीला धरले जाणार आहे.बँकेतून पैसे काढण्याच्या मर्यादेमुळे देशातील ९० टक्के मालवाहतूक ठप्प झाली असून इंधनासाठी पैसे नसल्याने बुधवारपर्यंत स्कूल व आॅफिसच्या बससेवाही बंद होतील, असे स्कूल बसचालकांच्या संघटनांचे म्हणणे आहे. स्कूल बस आणि आॅफिस बसमालकांकडे सुमारे १० गाड्या असतात. त्या चालवण्यासाठी दिवसाला सरासरी २० हजार रुपये लागतात. काही मालकांकडे ३० स्कूल व आॅफिस बस आहेत. त्यामुळे आठवड्याला २० हजार रुपये मिळाल्यानंतर इतक्या मोठ्या संख्येने बस चालवणे कठीण आहे. त्यामुळे बँकेतून दिवसाला किमान २ लाख रुपये काढण्याची सवलत वाहतूकदारांना देण्याची मागणी बॉम्बे गुड्स अॅण्ड ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष अशोक राजगुरू यांनी केली आहे. राजगुरू यांनी सांगितले की, संघटनेने कोणताही बंद पुकारलेला नाही. तर आर्थिक मर्यादेमुळे मालवाहतूक ठप्प पडली आहे. म्हणूनच वाहतूकदारांच्या प्रश्नांसंदर्भात सोमवारी एक तातडीची बैठक घेण्यात येणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन राज्यातील परिस्थितीबाबत चर्चा केली जाईल. पेट्रोलपंपावर जुन्या पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्याची मुदत १४ नोव्हेंबरला संपत आहे. मंगळवारपर्यंत बँकेतून काढण्यात येणाऱ्या रकमेत वाढ करण्याची गरज आहे, असे स्कूल अॅण्ड कंपनी बस ओनर्स असोसिएशन आॅफ महाराष्ट्रचे सदस्य रमेश मनिअन यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)
स्कूलबस, मालवाहतूक बुधवारपासून होणार ठप्प?
By admin | Published: November 14, 2016 5:45 AM