मुंबई : नवीन शैक्षणिक वर्षात वाढणाऱ्या खर्चाच्या हिशोबात आता पालकांना स्कूलबसचा खर्च वाढणार आहे. १ एप्रिलपासून राज्यभरातील स्कूलबसच्या शुल्कात २० टक्क्यांनी तर टोल लागणाऱ्या ठिकाणी २५ टक्क्यांनी वाढ करण्यात येणार असल्याचे स्कूलबस ओनर्स असोसिएशनने जाहीर केले आहे. त्यामुळे पालकांना हिशेबाचे गणित पुन्हा एकदा मांडायला लागणार आहे. मुंबईत साडेआठ हजार तर राज्यभरात ४० हजार खासगी स्कूलबस आहेत. स्कूलबसच्या देखभालीचा, पार्किंगचा खर्च वाढला आहे. प्रत्येक वर्षी पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ होत आहे. याचबरोबर परिवहन विभागाने स्कूलबससाठी विशेष नियमावली आखली आहे. या नियमांचे पालन करण्यासाठी बस, गाड्यांमध्ये बदल करणे आवश्यक आहे. यामुळे बसचालकांच्या खर्चात किती तरी टक्क्यांनी वाढ झाली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य सेवासुविधा देण्यासाठी बदल केले आहेत. त्यामुळे एप्रिल महिन्यापासून २० आणि २५ टक्के शुल्कात वाढ करण्यात आल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी स्पष्ट केले. स्कूलबसचा विमा असणे आवश्यक आहे. विम्यामुळे बसमालकांचा खर्च ५० टक्क्यांनी वाढला आहे. नियमावलीनुसार बसचा खर्च २० टक्क्यांनी वाढला आहे. स्कूलबसमध्ये सीसीटीव्ही बसवणे, जीपीएसची सुविधा, असिस्टंट यामुळे खर्चामध्ये वाढ झाली आहे. पेट्रोल, डिझेलचा भाव १५ ते १८ रुपयांनी वर्षभरात वाढला आहे. या सर्व खर्चाचा विचार करूनच शुल्कात वाढ करण्यात आली असून शाळांबरोबर बैठक घेण्यात आली आहे. सीबीएसई बोर्डाच्या शाळा एप्रिल महिन्यात सुरू होणार आहेत. त्यामुळे १ एप्रिलपासूनच शुल्कात वाढ करण्यात आली असल्याचे गर्ग यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
राज्यभरात स्कूलबसचे शुल्क २० टक्क्यांनी वाढणार
By admin | Published: March 08, 2017 2:21 AM