नागपूर : ऑनलाईन ‘फ्री फायर गेम’च्या नादी लागलेली नागपुरातील तीन शाळकरी मुले शनिवारी भल्या सकाळी घरून निघून गेली. पालक आणि पोलिसांनी वेळीच सतर्कता दाखविल्याने मुले रेल्वेद्वारे मुंबईकडे जात असल्याचे लक्षात आले. आरपीएफच्या मदतीने सायंकाळी या तिघांना नाशिक रेल्वे स्थानकावर ताब्यात घेतले. काही काळ पालकांच्या काळजाचे ठोके मात्र चुकले होते.
१५, १६ आणि १७ वर्षे वय असलेली ही तिन्ही मुले दहावीत शिकतात. ऑनलाईन क्लासच्या नावाखाली हे तिघेही ‘फ्री फायर’ हा ऑनलाईन गेम खेळत होते. नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी बॅग घेऊन ते मॉर्निंग वाॅकसाठी घरून निघाले. नऊ वाजले तरी ते घरी परत आले नाहीत. त्यामुळे त्यांच्या आई-वडिलांनी एकमेकांकडे चौकशी केल्यावर उलगडा झाला. एकाने आपल्या आईला शुक्रवारी सायंकाळी आपण उद्या सकाळी मित्रांसोबत मुंबईला फ्री फायर गेमचे टूर्नामेंट खेळण्यासाठी जात असल्याचे सांगितले होते.
आईने त्याला मनाई केली. यावेळी त्याने ओके म्हणत संशय येणार नाही, याची काळजी घेतली. सकाळी घरून निघताना तो बॅगमध्ये कपडे घेऊन गेल्याचे आईच्या लक्षात आल्याने तिने मुलाच्या वडिलांना सांगितले. त्यानंतर या मुलाचे आई-वडील त्याच्या मित्राच्या घरी गेले. तेव्हा तो सुद्धा घरून मॉर्निंग वॉकच्या बहाण्याने बॅगमध्ये कपडे भरून गेल्याचे स्पष्ट झाले. तिसऱ्या मुलाच्या बाबतीतही असाच प्रकार घडल्याने ते पळून गेल्याचा निष्कर्ष पालकांनी काढला. त्यानंतर पालकांनी लगेच प्रतापनगर पोलीस ठाणे गाठले. तातडीने पोलीस पथक रेल्वेस्थानकावर पाठवण्यात आले.
सीसीटीव्ही फुटेजमुळे झाला खुलासा नागपूर रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता मुले हावडा-मुंबई स्पेशल ट्रेनमध्ये बसल्याचे दिसले. रेल्वे पोलीस, आरपीएफच्या अधिकाऱ्यांनी अकोला, जळगाव, नाशिक व मुंबई रेल्वे पोलिसांना अलर्ट दिला. सायंकाळी नाशिक स्थानकात गाडी थांबताच तिघांना आरपीएफने ताब्यात घेतले.
असा आहे फ्री फायर गेम२०१९ चा जगातील सर्वाधिक लोकप्रिय ठरलेला फ्री फायर ऑनलाईन गेम
- एकाच वेळी ५० जण खेळू शकतात.- विमान किंवा हेलिकॉप्टरमधून पॅराशूटच्या माध्यमाने बेटावर उडी घ्यायची आणि तेथे दडून असलेल्या अन्य ४९ जणांना शोधून वेगवेगळ्या शस्त्राच्या आधारे ठार मारायचे. - जो एक शिल्लक राहील, तो गेमचा ‘विनर’, असा हा गेम आहे.