मुंबई : शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण क्षेत्र संघटना समन्वय समितीच्या वतीने येत्या मंगळवारी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक ‘शाळा बंद’ आंदोलनाचा इशारा दिला आहे. राज्यातील नवीन सरकारने शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर अद्यापपर्यंत कोणताही तोडगा काढलेला नाही. याविरोधात शिक्षक, मुख्याध्यापक, संस्थाचालकांच्या विविध १८ संघटना एकत्रित आल्या आहेत. त्यामुळे राज्यातील शाळा बंद राहण्याची शक्यता आहे.चिपळूणकर समितीच्या शिफारशींप्रमाणे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे मंजूर करावीत, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे २००४पासून बंद करण्यात आलेले अनुदान सहाव्या वेतन आयोगानुसार सुरू करावे, आदी मागण्यांसाठी ‘शाळा बंद’ आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनानंतरही सरकारने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास २ फेब्रुवारीनंतर बेमुदत ‘शाळा बंद’ आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र राज्य शिक्षण क्षेत्र संघटना समन्वय समितीने दिला आहे.
शिक्षण क्षेत्र संघटनांचे उद्या ‘शाळा बंद’ आंदोलन
By admin | Published: January 12, 2015 3:32 AM